Mumbai Traveler Stranded at Moscow Airport Amid War Crisis : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर मोठा परिणाम झाला असून, याचा फटका एका मुंबईकर प्रवाशाला बसला आहे. सुनील गुप्ता नावाचा हा तरुण मॉस्को विमानतळावर अडकला असून त्याच्याकडे जेवण आणि पाण्यासाठीही पैसे उरले नसल्याचं त्यानं सांगितलं. सोशल मीडियावर त्याने आपली व्यथा मांडल्यानंतर भारत सरकार आणि रशियन दूतावासाने तातडीने हालचाली करत त्याला दिलासा दिला आहे.
का ओढवली बिकट वेळ?
सुनील गुप्ता हा मॉस्कोहून अबू धाबीमार्गे मुंबईला परतणार होता. मात्र, कोणतीही पूर्वसूचना न देता त्याचे विमान रद्द करण्यात आले. रशियामध्ये सध्या सुरू असलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे व्हिसा आणि मास्टरकार्ड यांसारख्या आंतरराष्ट्रीय सेवा तिथे चालत नाहीत, त्यामुळे सुनीलकडे रोख रक्कम संपली होती.
परदेशात एकटाच अडकल्याने आणि खाण्यापिण्याची सोय नसल्याने तो अत्यंत हताश झाला होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण एखाद्या भिकाऱ्यासारखे तिथे उभे असून मदतीची गरज असल्याचे सांगितले.
( नक्की वाचा : Pune News: पुणे मेट्रोचा धमाका! कॅम्प, पुलगेटमार्गे थेट उंड्री गाठता येणार, वाचा कुठून जाणार ट्रेन )
सुनीलने आरोप केला आहे की, इतिहाद एअरवेजच्या जमिनीवरील कर्मचाऱ्यांनी त्याला कोणतीही मदत केली नाही. मदत मागण्यासाठी गेल्यावर कर्मचारी पाठ फिरवून निघून जात होते आणि केवळ कस्टमर केअरला फोन करण्यास सांगत होते. अनेक तास प्रयत्न करूनही कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. 'मेक माय ट्रिप' आणि विमान कंपनी या दोन्ही संस्थांनी आपल्याला वाऱ्यावर सोडल्याची भावना त्याने व्यक्त केली. कुटुंबाशी संपर्क होऊ शकत नसल्याने त्याने ट्विटरच्या माध्यमातून मदतीची याचना केली होती.
I'm completely stranded at Moscow airport… alone, helpless, and running out of hope.
— Sunil Gupta (@HeySunilGupta) March 2, 2026
No one from @makemytripcare or @etihad is answering my desperate messages.
Russia doesn't accept Visa or Mastercard anymore.
I have ZERO cash left. Not even for food or water.
The Etihad…
भारतीय दूतावास आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची तत्परता
सुनीलची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने याची दखल घेतली. दूतावासाने तातडीने त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला आवश्यक ती मदत उपलब्ध करून दिली.
दूतावासाने नंतर अपडेट दिले की प्रवाशाची समस्या सोडवण्यात आली आहे. यासोबतच भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील या प्रकरणाची दखल घेत सुनीलकडून त्याचा PNR नंबर आणि इतर माहिती मागवली, जेणेकरून त्याला सुरक्षित घरी परत आणता येईल.
इतिहाद एअरवेजकडून दखल आणि पुढील कार्यवाही
या गोंधळानंतर इतिहाद एअरवेजच्या अधिकृत मदत कक्षाने देखील सुनीलच्या पोस्टला उत्तर दिले. कंपनीने या घटनेबद्दल खेद व्यक्त करत प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.
सध्या युद्धामुळे विमानांचे मार्ग बदलले जात असल्याने अनेक प्रवाशांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र, भारतीय दूतावासाच्या सतर्कतेमुळे एका मुंबईकर तरुणाचा जीव भांड्यात पडला असून त्याला सुरक्षितपणे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world