Europe Heatwave : युरोप सध्या भीषण उकाड्याचा सामना करीत आहे. फ्रान्सच्या आरोग्य संघटनेने १००० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. मात्र मृत्यूचा आकडा १३०० हून अधिक असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २० जूनपासून सुरू झालेली उष्णतेची लाट आतापर्यंत सर्वात घातक उन्हाळा असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक देशांमध्ये तापमानाचा पारा ४० डिग्रीच्या पार गेला आहे.
वृद्ध आणि अशक्त किंवा आरोग्याच्या आधीच समस्या असलेल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार जलवायू परिवर्तनामुळे उष्णतेची लाट तयार झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रात्रीच्या वेळीही तापमान इतकं जास्त असतं की शरीराला आराम मिळणं कठीण झालं आहे.
रात्रीच्या वेळीही दिलासा नाही...
फ्रान्समधील सार्वजनिक आरोग्य संस्थेने इशारा दिला आहे की, वृद्धाश्रम आणि इतर ठिकाणातील मृत्यूंची संपूर्ण आकडेवारी अद्याप उपलब्ध नसल्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढू शकते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस म्हणाले की, सध्या १५ कोटी लोक तीव्र उष्णतेचा सामना करत आहेत. शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. शाळा बंद आहेत, वीज वितरण प्रणाली कोलमडत आहेत. त्यांनी इशारा दिला आहे की, हवामान बदलामुळे ज्या उष्णतेची लाट पूर्वी 'एका पिढीत एकदा' येत असत, ती आता प्रत्येक वर्षात येत आहे. युरोपमधील घरे, कार्यालये आणि शाळा उष्णतेसाठी सुसज्ज नाहीत. जुन्या इमारतींमध्ये अनेकदा वातानुकूलन यंत्रणा नसते. उन्हाळ्यात रात्रीच्या वेळीसुद्धा तापमान कमी होत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त तापमानाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने हृदय, फुप्फुसं आणि मेंदूवर दबाव येतो. जे लोक पूर्वी जास्त तापमानाच्या संपर्कात आले आहेत, त्यांना विशेष धोका असतो.
दिलासा कधी मिळेल?
चांगली बातमी ही आहे की या आठवड्यात पश्चिम युरोपमध्ये थंड वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रज्ञांनुसार, फ्रान्स, जर्मनी आणि झेक प्रजासत्ताकमध्ये वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णता कमी होईल. फ्रेंच हवामान विभागाने सांगितलं की, बहुतेक भागांमध्ये तीव्र उष्णता कमी झाली आहे, मात्र उत्तर-पूर्वेकडे नागरिकांनी अधिक काळजी घ्यायला हवी.