केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तब्बल 9 वर्षांनंतर एखादा भारतीय मंत्री पाकिस्तानचा दौरा करणार आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (SCO) च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्मेंटची बैठक होणार आहे. त्या बैठकीला जयशंकर उपस्थित राहणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी ( 4 ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, 'पाकिस्ताननं 29 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. सर्व देशांच्या प्रमुखांना या बैठकीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण पाठवलं आल्याची माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहारा बलोच यांनी दिली होती. त्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांचा हा दौरा निश्चित झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मोदींनी 2015 साली केला होता दौरा
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी 2015 साली पाकिस्तानमध्ये गेले होते. पंतप्रधानांनी अचानक पाकिस्तानला भेट दिली होती. मोदींनी तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेतली. त्यानंतर 2015 साली तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीमधील कलम 370 रद्द केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय बैठक झालेली नाही.
( नक्की वाचा : इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती? )
काय आहे SCO?
मध्य आशियातील देशांमध्ये शांतता आणि सहकार्यासाठी SCO या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, चीन, रशिया, कजाकिस्तान, तजाकिस्तान, उज्बेकिस्तान, किर्गिस्तान या संघटनेचे सदस्य आहेत. भारत 2017 साली या संघटनेचा सदस्य झाला. त्यानंतर इराणनं 2023 साली या संघटनेचं सदस्यत्व स्विकारलं. सध्या SCO देशांमध्ये जगभरातील लोकसंख्येच्या 40 टक्के लोकं राहतात. संपूर्ण जगभरातील GDP मध्ये SCO देशांचा 20% भाग आहे.