पंतप्रधान नरेंद्र मोदी G-7 देशांच्या शिखर परिषदेसाठी इटलीला गेले आहेत. तीन दिवस या परिषदेला उपस्थित राहून ते आज (शनिवार, 15 जून ) भारतामध्ये परतणार आहेत. जगातील सात बलाढ्य देशांच्या या शिखर परिषदेला भारताला विशेष निमंत्रित करण्यात आलंय. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी या परिषदेच्या यजमान या नात्यानं पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं.
जॉर्जिया मेलोनी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्हिडिओ शेअर केला. मित्रांनो, टीम मेलोडीकडून नमस्कार असं इटलीच्या पंतप्रधानांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं. मेलोनी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील शेअर केलाय. त्यांनी या व्हिडिओला मेलोडी #Melodi असा हॅशटॅग दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्यांनी 'भारत-इटली मैत्री चिरायू होवो', अशी भावना ट्विट करुन व्यक्त केल्या आहेत.
इटलीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत एक सेल्फी देखील काढला. तो फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यंदाच्या जी-7 शिखर परिषदेत यजमान इटलीसह अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, कॅनडा आणि जपान या देशांनी भाग घेतला. इटलीच्या निमंत्रणावर भारत, ब्राझील, अल्जेरिया, अर्जेंटीना, जॉर्डन, केनिया, मॉरिटानिया, ट्यूनेशिया, तुर्किये आणि संयुक्त अरब अमिरात हे देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी झाले होते.