आजही कोरोनाच्या नावाने लोकांना भूतकाळातील भयंकर दिवसांची आठवण येते आणि त्यांच्या अंगावर काटाच उभा राहतो. अद्यापही कोरोना विषाणूच्या संसर्गातून जग पुरतं बाहेर आलेलं नाही. कोरोनाच्या भीतीतच शास्त्राज्ञांनी आणखी एका भयंकर संसर्गाचा इशारा दिला आहे. बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांकडून इशारा देण्यात आला आहे. बर्ड फ्लूमुळे उद्भवणारी महासाथ ही कोरोनापेक्षा शंभर पटीने अधिक धोकादायक असेल, अशी माहिती तज्ज्ञांकडून दिली जात आहे.
कोरोनापेक्षाही बर्ड फ्लू अधिक धोकादायक...
बर्ड फ्लू महासाथ पसरण्याची शक्यता वाढली असून अमेरिकेत H5N1 एवियन फ्लू जलद गतीने पसरत आहे. अमेरिकेतील प्रत्येक राज्यात जंगलातील पक्षांसह व्यावसायिक पोल्ट्री आणि घराजवळ पाळणाऱ्या पशू-पक्षांवर याचे परिणाम दिसून येत आहेत.
अमेरिकेतील चार वेगवेगळ्या राज्यातील सस्तन प्राण्यांसह अनेक गुरेढोरे संक्रमित आढळली प्राण्यांव्यतिरिक्त टेक्सासमधील एका डेअरी कर्मचाऱ्यातही हा व्हायरस आढळला आहे. अशाप्रकारे बर्ड फ्लूची प्रकरणं समोर येत असल्याने शास्त्रज्ञांसह जगासाठी हा चिंतेचा विषय झाला आहे. पिट्सबर्गमनधील प्रसिद्ध बर्ड फ्लू संशोधक सुरेश कुचिपुडी यांनी नुकतच या मुद्द्यावर चर्चा करताना सांगितलं की, हा विषाणू अनेक वर्षांपासून आणि कदाचित अनेक दशकांपासून महामारीच्या यादीत सर्वात वरच्या स्थानी राहिला आहे. न्यूयॉर्क पोस्टने डेली मेलमध्ये आलेल्या वृत्ताच्या आधारावर ही बातमी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे धक्कादायक आकडे
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकड्यांनुसार, 2003 पासून H5N1 व्हायरसचा संसर्ग झालेल्या 100 रुग्णांपैकी 52 जणांचा मृत्यू झालेला आहे. यानुसार H5N1 चा मृत्यूदर पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. याची तुलना कोरोना व्हायरसची केली तर या महासाथीच्या सुरुवातील काही ठिकाणी याचा मृत्यूदर 20 टक्क्यांपर्यंत होता. काही काळानंतर हा 0.1 पर्यंत खाली घसरला होता. आतापर्यंत बर्ड फ्लूचे 887 प्रकरणं दाखल झाली असून ज्यात 462 जणांचा मृत्यू झाला आहे.