संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि त्याच्या आजूबाजूच्या देशांमध्ये मंगळवारी तुफान पाऊस झाला. वर्षभराचा पाऊस एकाच दिवसा कोसळावा अशी परिस्थिती तिथं निर्माण झाली आहे. संपूर्ण दुबईतील रस्त्यांवर ठिकठिकाणी वाहनं उभी आहेत. मुसळधार पावसामुळे युएईमध्ये विमानतळावर पाणी जमा झालं आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. मात्र पावसामुळे अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत.
दुबई विमानतळावर मंगळवारी तब्बल 12 तासांच्या आत तब्बल 100 मिलीमीटर आणि 24 तासात एकूण 160 मिलीमीटर पाऊस दाखल केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुबई शहरात संपूर्ण शहरात तब्बल 88.9 मिलीमीटर पाऊस नोंदवला जातो.
शेजारील ओमान देशात पुरपरिस्थितीमुळे मृतांचा आकडा 18 पर्यंत पोहोचला आहे. मुसळधार पावसामुळे युएई प्रशासनाने मंगळवारी लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे. शाळा ऑनलाइन भरवण्यात येत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनाही घरून काम करण्यास सांगण्यात आलं आहे.
पुढील 24 तास हवामान विभागाकडून अलर्ट...
राष्ट्रीय हवामान विज्ञान केंद्राने दुबई, अबुधाबी, शारजाह आणि काही अन्य अमीरातच्या भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता व्यक्त केली आहे. ओमानमध्ये पावसामुळे आलेल्या पुरामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शाळेच्या 10 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांची बस पुरात वाहून गेली होती. त्यामुळे दुबई सरकारकडून ऑनलाइन शाळा घेण्याचं आवाहन केलं जात आहे.