पाकिस्तानचे सिनेटर दानेश कुमार यांनी सिंध प्रांतामध्ये हिंदू मुलींच बळजबरीनं अपहरण आणि धर्मांतराच्या गंभीर प्रश्नाकडं जगाचं लक्ष वेधलं आहे. दानेश यांनी सिनेटमध्ये बोलताना हा प्रश्न मांडला. 'हिंदू मुली म्हणजे लुटीचा माल नाही,' असं त्यांनी सुनावलं. सिंध प्रांतामध्ये हिंदू मुलीचं जबरदस्तीनं इस्लाम धर्मात धर्मांतर केलं जातं. निष्पाप पूजा कुमारीच्या अपहरणाला दोन वर्ष झाली आहेत. सरकार त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई करत नाही,' असा दावा दानेश यांनी केला. त्यांच्या भाषणातील हा मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रभावशाली व्यक्ती आणि धार्मिक समुहांकडून हिंदू मुलींचं अपहरण आणि बळजबरीनं धर्मांतर करण्यात येत आहे. या प्रकाराला राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. त्यांना जबरदस्तीनं इस्लाम कबूल करायला भाग पाडलं जात आहे. मुस्लीम पुरुषांशी त्यांचं लग्न लावून दिलं जातं. या अल्पवयीन मुली स्वखुशीनं धर्मांतर करत असल्याचा बनाव केला जातो, असा आरोप दानेश यांनी केला.
'इल्लामवरची निष्ठा पक्की आहे हे दाखवण्यासाठी प्रभावशाली धार्मिक समूहांकडून धर्मांतर केले जात आहे. वास्तविक इस्लामच्या शिकवणुकीमध्ये याला परवानगी नाही,' असं दानेश यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून होत असलेल्या प्रकाराला दानेश यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय. अनेक जागतिक संघटनांकडून पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या होत असलेल्या छळवणुकीबाबत गंभीर आक्षेप आणि चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक हिंदू मुलीचे अपहरण, धर्मांतर आणि मुस्लीम पुरुषांशी त्यांचं लग्न लावून देण्याचे अनेक प्रकरणं उघड झाली आहेत. संयुक्त राष्ट्रानं (UN) नुकतीच पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समाज, तरुण महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचं मत व्यक्त केलंय.
( नक्की वाचा : लंडन महापौर निवडणुकीला भारत-पाकिस्तान मॅचचं स्वरुप का आलंय? )
'ख्रिश्चन आणि हिंदू मुलींना जबरदस्तीनं धर्मांतर, अपहरण, तस्करी, बालविवाह, लैंगिक शोषण या गोष्टींना बळी पडावं लागतंय. जबरदस्तीनं होणाऱ्या लग्नाला धार्मिक आणि सांस्कृतिक आधारावर योग्य ठरवता येत नाही, असं संयुक्त राष्ट्रानं स्पष्ट केलं होतं.