लंडनच्या महापौरपदासाठी (London Mayor Election) आज मतदान होत आहे. सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत मतदान होणार आहे. यंदाची निवडणूक ही भारत-पाकिस्तान मॅचसारखी बनलीय. महापौरपदासाठी एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये मूळ भारतीय वंशाचे तरुण गुलाटी (Tarun Gulati) यांचा समावेश आहे. दुसरीकडं पाकिस्तानी मूळ असलेले सादिक खान तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. सादिक खान लेबर पार्टीचे उमेदवार आहेत. ते यापूर्वी दोन वेळा लंडनचे महापौर होते. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान (Pakistan) वंशांच्या उमेदवारांमध्ये यंदा लढत होतीय. दोन्ही उमेदवारांनी विजयाचा दावा केलाय.
तरुण गुलाटी यांनी सादिक खान यांची धोरणं चुकीचं असल्याचं सांगत महापौरपदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केलाय. लंडनमध्ये एकूण 60 लाख मतदार आहेत. इथं जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती तसंच पर्यावरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सादिक खान यांच्यासह कन्झर्वेटीव्ह पक्षाच्या सुसान हाल या देखील महापौरपदाची निवडणूक लढवत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोण आहेत गुलाटी?
तरुण गुलाटी यांनी जयपूरमधून पदवी आणि त्यामंतरचं शिक्षण घेतलंय. दिल्लीमधून MBA झाल्यानंतर इंटरनॅशनल ट्रेडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ते लंडनमध्ये शिफ्ट झाले. ते इनव्हेस्टमेंट बँकर असून अपक्ष म्हणून लंडनच्या महापौरपदाची निवडणूक लढवत आहेत.
लंडनच्या नागरिकांच्या चेहऱ्यावरील हसू आणि त्यांचा उत्साह परत आणण्यासाठी मी ही निवडणूक लढवत असल्याचं गुलाटी यांनी सांगितलं. लंडनमधील आरोग्य व्यवस्था खराब आहे. सुरक्षा व्यवस्था ही बिकट झालीय. मला या सर्व गोष्टी चांगल्या करायच्या आहेत, असं गुलाटी यांनी सांगितलं.
लेबर पार्टीचे सादिक खान 2016 पासून लंडनचे महापौर आहेत. तरुण गुलाटी यांनी NDTV ला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये खान यांच्यावर जोरदार टीका केलीय. 'सध्याचे महापौर सादिक खान यांनी लंडन शहर उद्धवस्त केलं आहे. या शहरामध्ये इतक्या गुन्हेगारी घटना यापूर्वी कधीही झालेल्या नाहीत. लंडन हे जगातील सर्वात गर्दीचं आणि त्याचबरबोर संथ शहर आहे. गेल्या वर्षभरात 21 किशोरवयीन मुलांनी त्यांचा जीव गमावलाय. सादिक खान यांच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 8 वर्षांमध्ये 1000 पेक्षा जास्त हत्यांच्या घटना घडल्या आहेत.
( नक्की वाचा : लंडन हादरलं! अज्ञाताकडून लोकांवर तलवारीने सपासप वार; लहानग्याचा मृत्यू-अनेकजण जखमी )
लंडनच्या नागरिकांची सुरक्षितता हे माझं प्राधान्य आहे. प्रत्येकानं मतदान केलं तर माझा विजय नक्की आहे,' असा विश्वास गुलाटी यांनी व्यक्त केला. गुलाटी यांनी सिटी बँक आणि HSBC बँकेच्या माध्यमातून सहा देशांमध्ये काम केलंय. ते HSBC मध्ये इंटरनॅशनल मॅनेजरही होते. 'मी लंडनकडं ग्लोबल सिटी म्हणून पाहतो. हे वर्ल्ड बँकेसारखं शहर आहे. इथं जगभरातील लोकं एकत्र येतात,' असं गुलाटी यांनी सांगितलं.
भारतीय वंशाचा अभिमान
मी भारतीय वंशाचा नागरिक आहे. मला याचा अभिमान आहे. पण मी विश्वाचा नागरिक आहे. मी जगभरात राहिलोय. त्यामुळे लंडनसाठी बॅटिंग करताना मला आनंद वाटतोय. मी लंडनवासियांसाठी या शहराचा पुढचा महापौर बनेल,' असं गुलाटी यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world