होर्मुजची सामुद्रधुनी सध्या जगातील सर्वात धोकादायक युद्धक्षेत्र बनली आहे. इराणने आपल्या भौगोलिक फायद्याचा वापर करत या भागात हजारो सी-माइन्स (Sea Mines) तैनात केले आहेत. या एका इशाऱ्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती निर्माण झाली असून, अमेरिकन नौदलाने हे सुरंग हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.
इराणचा 'माइन' प्लॅन किती घातक?
इराणकडे 5000 ते 6000, समुद्री सुरंग असल्याचा सेंटर फॉर स्ट्रेटजिक अँड इंटरनेशनल स्टडीजचा अहवाल आहे. यामध्ये प्रामुख्याने चार प्रकारच्या सुरुंगांचा समावेश आहे.
महाम-3 आणि महाम-7 हे 'मूर्ड' आणि 'लिम्पेट' माइन्स आहेत. लिम्पेट माइन गोताखोर जहाजाच्या तळाला चिकटवू शकतात, तर महाम-3 समुद्राच्या पृष्ठभागाखाली तरंगत राहतात. तर सदाफ-2 (SADAF-02) हे अत्यंत शक्तिशाली पारंपरिक माइन आहेत. 1988 मध्ये अशाच एका माइनने अमेरिकन युद्धपोत USS Samuel B. Roberts ला जवळपास बुडवले होते.
इन्फ्लुएन्स माइन्स: हे सुरंग जहाजाला स्पर्श न करताही त्याच्या आवाजाच्या (Acoustic), चुंबकीय क्षेत्राच्या (Magnetic) किंवा पाण्याच्या दाबाच्या (Pressure) मदतीने ओळख पटवून धमाका करतात. तर बॉटम माइन्स हे समुद्रतळाला वाळूत किंवा चिखलात गाडले जातात, ज्यामुळे त्यांना शोधणे अशक्यप्राय होते.
(नक्की वाचा- Ashok Kharat: खरातच्या कार्यक्रमात गेले, हसत-हसत भाषणही ठोकलं; वरिष्ठ IPS अधिकारी गोत्यात? VIDEO समोर)
माइन स्वीपिंग धोकादायक काम
समुद्रातील हे सुरंग हटवणे (Minesweeping) हे अत्यंत गुंतागुंतीचे काम आहे. हे सुरंग चुंबकीय शक्तीने फटू नयेत म्हणून लोखंडाऐवजी ग्लास, फायबर किंवा लाकडापासून बनवलेल्या जहाजांचा वापर केला जातो. मानवी जीव वाचवण्यासाठी आता Mk 18 Knifefish सारख्या पाण्याखालील रोबोटिक ड्रोन्सचा वापर केला जात आहे, जे माइन शोधून त्याला लहान बॉम्बने उडवून देतात. काही माइन्स 'शिप काउंटर'ने सज्ज असतात. ते सुरुवातीची 2-3 जहाजे जाऊ देतात आणि नंतरच्या जहाजावर धडकतात.
एका माइनसाठी 10 लाख डॉलर्सचा खर्च
एक साधा समुद्री माइन बनवण्यासाठी केवळ 2000 ते 20000 डॉलर्स खर्च येतो. मात्र, तो शोधून सुरक्षितपणे नष्ट करण्यासाठी 10 लाख डॉलर्सपेक्षा (सुमारे 8.3 कोटी रुपये) जास्त खर्च होतो. अमेरिकेच्या या मोहिमेमुळे जागतिक संरक्षण खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा- Ahilyanagar News: कॅन्सर बरा करणारा ‘गडगे महाराज' अडचणीत? अंनिस आक्रमक)
काय आहे अमेरिकेची नाकेबंदी?
अमेरिकेने इराणच्या बंदरांकडे जाणारी वाहतूक रोखण्यासाठी नाकेबंदी जाहीर केली आहे. इराणने होर्मुजमध्ये घातलेल्या सुरुंगांमुळे केवळ लष्करीच नव्हे तर व्यापारी जहाजांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षित रस्ता शोधण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो, तोपर्यंत जागतिक इंधन पुरवठ्यावर याचे गंभीर परिणाम होतील.