Scorpion Drug : पाकिस्तानात चरस, गांजापेक्षाही अधिक नशा देणाऱ्या पदार्थांचा वापर करण्याचा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील लोक आता विंचवाची नशा करू लागले आहेत. हा ट्रेंड नवा नाही. ६० च्या दशकात कोणा व्यक्तीने याची सुरुवात केली होती. यानंतर कट्टर नशा करणारे व्यसनी यामध्ये रुची घेऊ लागले. व्यसन एक धोकादायक आणि वाईट सवय आहे. मग ते कोणत्याही प्रकारचा असो. कोणत्याही प्रकारची नशा थेट आरोग्यावर परिणाम करते. विशेषत: अशी नशा ज्यात पाल किंवा विंचवासारख्या जीवांचा वापर केलेला असेल.
विंचूची नशा कशी केली जाते?
विंचूला मारून त्याचा नशेसाठी वापर करण्याची सुरुवात पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून सुरू झाली. पाकिस्तानमधील हा भाग चरस आणि अफीमच्या शेतीसाठी ओळखला जातो. येथे गांजा, अफीम आणि चरस सारख्या गोष्टी सर्वसामान्य आहेत. कदाचित याच कारणामुळे काही कट्टर व्यसनींनी आणखी एक पाऊल पुढे जाच विंचू मारून त्याचे रक्त पिण्याची पद्धत शोधून काढली.
एक्स्प्रेस ट्रिब्यूनच्या एका वृत्तानुसार, खैबर पख्तूनख्वाच्या मोहम्मद तौफेल यांनी सांगितलं होतं की, त्यांच्यासाठी विंचू खाणं एक धोकादायक गोष्ट होती. त्यांनी सांगितलं होतं की, जेव्हा मी पहिल्यांदा चरससह विंचूचं सेवन केलं तेव्हा मला वेगळाच अनुभव आला. मला कळत नव्हतं की, माझ्यासोबत काय घडतंय. डोळ्यांसमोर सर्व दृश्य नाचताना दिसत होतं. तो पुढे म्हणाला, माझं शरीर आणि मेंदू उत्तेजित झालं होतं. माझ्या मित्रांनी सांगितलं की, एका तासापर्यंत मी आरडाओरडा करीत होतो. शुद्धीवर आल्यानंतर मी ही नशा पुन्हा कधीच न करण्याचं ठरवलं.
विंचूची नशा कशी तयार करतात?
विंचू धूम्रपानासाठी तयार करण्याची प्रक्रिया खूप वेळखाऊ आहे. तौफेलनुसार, मृत विंचू किंवा विंचूला मारून त्याला अत्यंत सावधपणे वाळवलं जातं. सुरुवातीला हा विंचू उन्हात वाळवला जातो. हे विंचू मुंग्या किंवा इतर किड्यांपासून दूर ठेवणं आवश्यक असतं. कारण हे छोटे जीव विंचूचं विष शोषून घेतात. मेलेला विंचू पूर्णपणे वाळल्यानंतर त्याची पावडर केली जाते. यानंतर ही पावडर गांजा किंवा चरससह पेपरमध्ये रोल करून किंवा चिलममध्ये भरून ओढली जाते.
काही लोक थेट विंचूचा नशा करतात. म्हणजे विंचूची पावडर गांजा किंवा चरसमध्ये एकत्र न करता थेट जाळून रोल करून ओढली जाते. घाईघाईत विंचूचा नशा तयार करायचा असेल तर मृत विंचू तव्यावर भाजून नंतर थंड करून त्याची पावडर केली जाते. काही लोक विंचूला मारून थेट आगीत टाकतात आणि पाइप लावून थेट धूर ओढतात. विंचूची नशा १० तासांपर्यंत राहते. यादरम्यान व्यसनीला काही लक्षात राहत नाही. तो बेशुद्ध होतो. शुद्धीत आल्यानंतर मात्र अंगदुखी, वेदना आणि अस्वस्थ वाटतं. याचा थेट परिणाम व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर होतो. पाकिस्तानात असे अनेकजण आहेत, ज्यांचं आरोग्य या नशेमुळ बिघडलं आहे.