अमेरिकेच्या टेरिफ यु्द्धात आता भारतीय मालावर येत्या 27 तारखेपासून 50 टक्के टेरिफ लागणार हे आता निश्चित झालं आहे. शिवाय भारत रशियाकडून कच्चे तेल घेऊन नफेखोरी करत असल्याचं अमेरिकेचं नॅरेटीव्ही पसरवण्यासाठी ट्रम्प प्रशासन जगभर प्रयत्न करत आहे. हे नॅरेटिव्ह तयार करण्यात ट्रम्प यांचा एक अत्यंत विश्वासू सहकारी काम करतोय. शिवाय ट्रम्प यांनी केलेल्या गेल्या महिन्याभरातील भारत विरोधी विधानांमागेचे शब्दही याचं सहकाऱ्यानं दिलेले आहेत. ट्रम्प यांच्या या सहकाऱ्याचं नावं आहे पीटर नवारो. मात्र भारतानेही अमेरिकेच्या या नॅरेटिव्हला जशाच तसे उत्तर दिले आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे प्रत्युत्त दिलं आहे.
आम्ही नफेखोरी करतोय असं जर तुम्हाला वाटत असेल, तु्म्ही आमच्या कडून तेल घेऊ नका असं एस जयशंकर यांनी ठणकावलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर केलेल्या नफेखोरीच्या आरोपांना हे खणखणीत उत्तर आहे. भारताने रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल खरेदी करुन जगाच्या बाजारातून नफेखोरी केली. युक्रेनमध्ये होत असलेल्या हजारो लोकांच्या मृत्यूशी भारताला काही देणं घेणं नाही. अशी पोस्ट ट्रम्प यांनी भारतावर टेरिफ लावण्या आधी केली होती. त्यावर भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी रशिया दौऱ्यावर उत्तरही दिलं.
नक्की वाचा - Good News: महिलांना 'या' रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, कुठे सुरू झाले असे हॉस्पिटल?
पण मग अगदी 48 तासात पुन्हा एकदा जयशंकर यांना असं उत्तर का द्यावं लागलं याचा माग काढला, तर लक्षात येतं की अमेरिकेचे अध्यक्ष ट्र्म्प यांचे व्यापारी सल्लागार पीटर नवारो यांनी 22 तारखेला भारताच्या नावानं पुन्हा एकदा शिमगा केला आहे. पीटर नवारो म्हणतात भारत रशियाकडून अगदी नगण्य प्रमाणात कच्चं तेल खरेदी करत असे. ऑक्टोबर 2022 मध्ये रशियानं युक्रेनवर हल्ला केला, तोपर्यंत हे प्रमाण अगदी नगण्य होतं. म्हणजे एकूण गरजेच्या 1 टक्क्यापेक्षाही कमी. असं पीटर यांनी सांगितलं.
पण आता हे प्रमाण जवळपास 30 ते 35 टक्क्यांवर पोहचलं आहे. त्यामुळे त्यांच्या घरच्या चुली पेटवण्यासाठी, गाड्या चालवण्यासाठी त्यांना रशियाचं ऑईल हवं आहे. त्याचा अमेरिकेवर थेट परिणाम होतोय. अमेरिका आणि भारत यांच्या खूप मोठी व्यापार तूट आहे. त्यामुळे अमेरिकन कामगार मोठे होत आहेत. भारताला जो पैसा या व्यापारी तुटीतून मिळतो, तो पैसा ते स्वस्तातलं तेल रशियाकडून खरेदी करतो. ते तेल रिफायनरीमध्ये शुद्धीकरण करुन पुन्हा पैसे कमावले जातात. पण भारताकडून मिळाणार पैसा रशिया शस्त्र बनवण्यासाठी वापरतो. त्याच शस्त्रांनी युक्रेनचे नागरिक मारतो. हे सगळं अमानुष आहे असं ही पुढे पीटर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री मे महिन्याच्या अखेरपर्यंत अगदी घट्ट होती. वारंवार दोघेही नेते तसं सांगतही होते. मग असं अचानक नॅरिटेव्ह बदलल्यासाठी काहीतरी कारण हवं होतं. हे कारण पीटर नवारो यांनी ट्रम्प यांना दिलं. आता या निमित्तानं पीटर नवारो नेमका कोण आहे याची चर्चा सुरू झाली आहे. पीटर नवारो हे सध्या व्हाईट हाऊसमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारी सल्लागार आहेत. ट्रम्प यांच्या सहीने ज्या देशांवर टेरिफ लावण्यात आलाय, त्यासाठीचे सगळे आदेश नवारो यांनी लिहिले आहेत. नवारो हे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक आहेत. 6 जानेवारी 2021 मध्ये जमाव अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय ऑव्हल ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पीटर नवारो यांना याप्रकरणी पोलिसांनी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं. पण त्यांनी चौकशीला हजेर लावली नाही.
चौकशीत सहकार्य न केल्यानं त्यांना चार महिन्याची शिक्षा आणि जवळपास 10 हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. ट्रम्प यांच्या मागच्या कालखंडाप्रमाणेच या कालखंडातही नवारो यांना व्हाईट हाऊसमध्ये नियुक्ती मिळालीय. पण यंदा नवारोंचे हात आणखी मजबूत असून ट्रम्प प्रशासनं व्यापार धोरण तेच निश्चित करतात. म्हणजेच टेरिफविषयी ट्रम्प यांच्या विधानांचा बोलविता धनी पीटर नवारो आहेत. पीटर नवारो यांचं 'डेथ बाय चायना' हे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्याचा देशाच्या अर्थकारणा विषयीचे पुस्तक बेस्टसेलर्स पैकी एक आहे. त्यात अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचेची कशी वाट लागलीय, याचा सविस्तर आढावा नवारोंनी घेतला आहे. पण भारताविषयीचं त्यांचा तर्कअजिबात स्विकारण्यासारखा नाही हे भारतानं अनेकदा समजावुन सांगितलेलं आहे असं आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक अनय जोगळेकर म्हणतात.