Iran-Israel Conflict: आज व्हॉट्सॲप हे जगभरात एकमेकांना तात्काळ संपर्क करण्याचं माध्यम बनलं आहे. मोबाईलमधील या अॅपच्या माध्यमातून आपल्याला हजारो मैल दूरवर असलेल्या व्यक्तीची खुशाली काही सेकंदात समजते. ही इन्स्टंट मेसेज सेवा आप्तकालीन तसंच युद्धजन्य परिस्थितीमध्ये आणखी महत्त्वाची ठरते. मात्र, इराणने देशात यावर बंदी घातली आहे. इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने आपल्या नागरिकांना व्हॉट्सॲप त्वरित डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ॲप डिलीट करण्याचे आवाहन
सरकारी दूरचित्रवाणी आयआरआयबीने (IRIB) मंगळवारी इराणी नागरिकांना फोनमधून व्हॉट्सॲप डिलीट करण्याचे आवाहन केले आहे. व्हॉट्सॲपवर इराणने आरोप केला आहे की, ॲप वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा आणि 'शेवटचे ज्ञात ठिकाण आणि संवाद' गोळा करून इस्रायलसोबत शेअर करत आहे. बुधवारी, इस्रायल आणि इराणमध्ये सलग सहाव्या दिवशी संघर्ष झाला. ज्यामध्ये इराणच्या तेहरानजवळील अणुस्थळावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे.
व्हॉट्सॲपनं काय सांगितलं?
व्हॉट्सॲपच्या प्रवक्त्याने आयआरआयबीच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे. त्यांनी सांगितलं की, ॲपवर पाठवलेले सर्व संदेश 'एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड' आहेत. ते संदेश पाठवणारा आणि प्राप्त करणाऱ्या व्यक्तीलाच पाहाता येतात. या प्रकराचे खोटे अहवाल आमच्या सर्व्हिसला ब्लॉक करण्याचे निमित्त बनतील, अळी आम्हाला काळजी आहे. आम्ही युझर्सच्या रिअल-टाईम स्थानांचा मागोवा घेत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : Iran-Israel conflict : '.... तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल',युद्ध चिघळणार? )
मेटा कंपनी व्हॉट्सॲप व्यतिरिक्त टेलिग्रामवरही बंदीची कुऱ्हाड कोसळली आहे. तेहरानने शुक्रवारी घोषणा केली आहे की, जोपर्यंत इस्रायलसोबतचा संघर्ष सुरू आहे तोपर्यंत इंटरनेट तात्पुरते बंद करत आहे. तेव्हापासून अनेक साइट्स आणि ॲप्सना ॲक्सेस करण्यात लोकांना अडचणी येत आहेत.
इराणच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी जनतेला 'इंटरनेटशी जोडलेल्या उपकरणांचा वापर कमीत कमी करण्यास आणि ऑनलाइन सावधगिरी बाळगण्याचे' आवाहन केले आहे. इराणने स्वत:च्या सुरक्षेसाठी, सरकारी कर्मचाऱ्यांवर आणि त्यांच्या सुरक्षा पथकाला इस्रायलच्या हवाई हल्ल्यादरम्यान स्मार्टफोन, घड्याळे आणि लॅपटॉपसह कोणत्याही कनेक्टेड डिव्हाइसचा वापर करण्यास प्रतिबंधित केले आहे.
( नक्की वाचा : Iran-Israel Conflict : इराण दाबणार जागतिक तेलपुरवठ्याची मान? भारतामध्ये निर्माण होणार भयंकर परिस्थिती! )
यापूर्वी 2022 मध्ये महसा अमिनीच्या ताब्यात मृत्यूनंतर जेव्हा इराणमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली होती. त्यावेळीही इराणच्या अधिकाऱ्यांनी व्हॉट्सॲपसह अनेक ॲप्स आणि ऑनलाइन सेवांना ब्लॉक केले होते.