Iran's attack on Isreal: इराण आणि इस्रायल या दोन कट्टर शत्रू देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. इराणने शनिवारी (13 एप्रिल) रात्री आणि रविवारी (14 एप्रिल) पहाटेच्या सुमारास बॅलिस्टिक क्षेपणास्त्र व ड्रोनसह इस्रायलवर हल्ला केला आहे. यानंतर संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देण्यात आला.
कोणत्या भागात करण्यात आले हल्ले?
जेरुसलेम, दक्षिणेकडील नेगेव वाळवंट आणि डेड सी, उत्तरेकडील इस्रायलच्या ताब्यात असणारे गोलन हाइट्स या भागामध्ये प्रामुख्याने हल्ले करण्यात आले आहेत.
भारताने केले हे आवाहन
इराण-इस्रायलमधील वादावर भारताने (India) चिंता व्यक्त करत म्हटले की, "इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या शत्रुत्वामुळे आम्ही चिंतित आहोत. यामुळे परिसरातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. आम्ही दोन्ही देशांना तातडीने तणाव कमी करण्याचे, संयम बाळगण्याचे, हिंसाचार न करण्याचे आवाहन करतो. आम्ही सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. येथील आमचे दूतावास या परिसरातील भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहे. परिसरामध्ये सुरक्षितता आणि स्थिरता राखणे महत्त्वाचे आहे".
आयडीएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, “मित्र राष्ट्रांच्या मदतीने आयडीएफ इस्रायल आणि येथील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी काम करत आहे".
इस्त्रायली सैन्य सतर्क
इस्रायल डिफेन्स फोर्सचे (आयडीएफ) प्रवक्ते डॅनियल यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, इस्रायलवर इराणकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. हवाई संरक्षण यंत्रणेकडून काही क्षेपणास्त्रांचा हल्ला रोखण्यात आला".
दुसरीकडे इस्रायलच्या कान टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, 400-500 ड्रोनपैकी सुमारे 100 ड्रेन अमेरिका, जॉर्डन आणि ब्रिटिश सैन्यासह मित्रराष्ट्रांच्या मदतीने इस्रायमध्ये पोहोचण्यापूर्वीच रोखले गेल्याची माहिती समोर आली आहे.
इराण-इस्राइलमधील या वादामागील नेमके काय आहे कारण?
इस्राइलने सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस ही घटना घडली होती. या हल्ल्यामध्ये दोन वरिष्ठ कमांडरसह सात जणांचा मृत्यू झाला होता. याचाच बदला म्हणून इराणकडून हे हल्ले केले जात असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा
इराण-इस्रायल वादात 17 भारतीय कैद!
चाकू हल्ल्यानं सिडनी हादरलं, मॉलमध्ये गोंधळ! 5 जणांचा मृत्यू