Earthquake in Iran: इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या भीषण वणव्यादरम्यान आता निसर्गाचाही मोठा तडाखा बसला आहे. मंगळवारी इराणच्या दक्षिण भागात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा भूकंप म्हणजे अण्वस्त्र चाचणी तर नाही ना? अशी चर्चा सुरू झाली होती, मात्र तज्ज्ञांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी मोजली गेली आहे. इराणच्या अणू तळांवर हल्ले होत असतानाच हा भूकंप झाल्याने जगभरात खळबळ उडाली होती. मात्र, अमेरिकन जिओलॉजिकल सर्व्हेने (USGS) हा भूकंप नैसर्गिक असल्याचे प्राथमिक रित्या स्पष्ट केले आहे.
भूकंपाचा केंद्रबिंदू आणि खोली
यूएसजीएस (USGS) नुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत 10 किलोमीटर खोलीवर होता. भूकंप झाल्यानंतर सोशल मीडियावर ही इराणची अण्वस्त्र चाचणी असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, तज्ज्ञांच्या मते, अण्वस्त्र चाचणीमुळे निर्माण होणाऱ्या लहरी आणि नैसर्गिक भूकंपाच्या लहरी यात मोठा फरक असतो. गेराशमधील भूकंप हा टेक्टोनिक प्लेट्सच्या हालचालीमुळे झाल्याचे संकेत मिळत आहेत.
(नक्की वाचा - Khamenei's Death: ट्रॅफिक कॅमेरे, मोबाईल नेटवर्क हॅक, वर्षानुवर्षे पाळत... खामेनींच्या मृत्यूची इनसाईड स्टोरी)
युद्धजन्य परिस्थिती आणि नुकसान
इस्रायल आणि अमेरिकन वायुसेना तेहरान, इस्फहान आणि कौम यांसारख्या शहरांवर सतत क्षेपणास्त्रे डागत आहेत. इराणच्या अनेक अणू तळांनाही या युद्धात लक्ष्य करण्यात आले आहे. दुसरीकडे, इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स (IRGC) इराक, कुवैत, बहरीन आणि सौदी अरेबियातील अमेरिकन तळांवर शाहेद ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहेत.
(नक्की वाचा- T20 World Cup: ...तर सामना न खेळताच भारत विश्वचषकातून बाहेर होणार? काय आहे ICC चा नियम?)
जीवितहानीबद्दल माहिती नाही
भूकंपामुळे गेराश प्रांतात किती नुकसान झाले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. युद्ध सुरू असल्यामुळे बचाव कार्यावर मर्यादा येत आहेत. इराणच्या अनेक प्रांतांत आधीच बॉम्बस्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना, या भूकंपाने त्यात अधिकच भर घातली आहे.