Iran's New Supreme Leader Mojtaba Khamenei First Speech : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांनी आपल्या नियुक्तीनंतरच्या पहिल्याच जाहीर निवेदनात गंभीर इशारा दिला आहे.अमेरिकेवर दबाव निर्माण करण्यासाठी जगातील अत्यंत महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेला हॉर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंदच असेल. त्याचबरोबर पश्चिम आशियातील शेजारील देशांवरील हल्ले सुरूच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पश्चिम आशियातील तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मोजताबा खामेनी स्वतः कॅमेऱ्यासमोर आले नाहीत, तर त्यांचे हे अधिकृत निवेदन गुरुवारी सरकारी टेलिव्हिजनवर एका वृत्त निवेदकाद्वारे वाचून दाखवण्यात आले.
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद ठेवण्याचा इशारा
मोजताबा खामेनी यांनी आपल्या पहिल्याच संदेशात अमेरिकेला लक्ष्य केले आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील मार्ग मानला जातो. हा मार्ग बंद ठेवल्यास जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. अमेरिकेला नमवण्यासाठी या मार्गाचा वापर एका प्रभावी शस्त्रासारखा केला जावा, असे खामेनी यांचे मत आहे.
तसेच या भागात असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांबाबतही त्यांनी कडक भूमिका घेतली आहे. या भागातील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ तात्काळ बंद करण्यात यावेत, असा इशारा त्यांनी दिला आहे. हे तळ कार्यरत राहिले तर त्यांच्यावर हल्ले केले जाऊ शकतात, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
( नक्की वाचा : Iran Israel War : फक्त 2 तासांची नोटीस अन् युद्धाच्या मैदानात भारतीय लेकीची एन्ट्री; वाचा थरकाप उडवणारी गोष्ट )
बदला आणि नुकसान भरपाईचा निर्धार
युद्धात मारल्या गेलेल्या आपल्या लोकांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्धार इराणच्या या सर्वोच्च नेत्याने व्यक्त केला आहे. इराण आपल्या शत्रूंकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवेल, असा दावा त्यांनी केला. शत्रूने ही भरपाई देण्यास नकार दिला, तर इराण त्यांच्या मालमत्ता ताब्यात घेईल किंवा त्या मालमत्तांचे तितक्याच प्रमाणात नुकसान करेल, असे खामेनी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे इराण भविष्यात अधिक आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत मिळत आहेत.
इराणच्या अध्यक्षांनी मांडल्या तीन अटी
दुसरीकडे इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी तीन प्रमुख अटी मांडल्या आहेत. रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर पेझेश्कियान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आपली भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही शांतता करारासाठी इराणच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता मिळणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात इराणवर कोणतेही हल्ले होणार नाहीत, याची आंतरराष्ट्रीय हमी द्यावी लागेल, अशी अट त्यांनी घातली आहे.
( नक्की वाचा : Khamenei Death: डेंटिस्ट बनून आले अन् खामेनींना संपवून गेले! मोसादच्या ऑपरेशनचा थरार वाचून डोकं चक्रावेल )
युद्धाच्या नुकसानीची मागणी
मसूद पेझेश्कियान यांनी आपल्या अटींमध्ये युद्धादरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, ही मागणी प्रामुख्याने केली आहे. झिओनिस्ट राजवट आणि अमेरिकेमुळे हे युद्ध भडकले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इराणच्या अधिकारांचे संरक्षण होत नाही आणि झालेल्या नुकसानीचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत हा संघर्ष थांबवणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. एकूणच सर्वोच्च नेते आणि अध्यक्ष या दोघांच्या विधानांवरून इराण सध्या तडजोड करण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.