Iran Israel War: अमेरिका आणि इराणमध्ये सध्या युद्धविराम झाला असला, तरी या संघर्षाने भारतासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे केले आहेत. तेलाच्या किमतींपासून ते सागरी व्यापार आणि सुरक्षेपर्यंत, या संपूर्ण घडामोडींनी हे दाखवून दिले की जागतिक संघर्षांचा परिणाम भारतासारख्या देशांवर किती वेगाने होतो. अशा परिस्थितीत ही केवळ एक आंतरराष्ट्रीय बातमी नसून भारतासाठी एक धोरणात्मक इशारा आहे.
ऊर्जा सुरक्षा: आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करणे गरजेचे
या युद्धाच्या काळात तेल पुरवठ्याला सर्वात मोठा धोका निर्माण झाला होता, विशेषतः 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'सारख्या महत्त्वाच्या मार्गावर. भारत आपल्या गरजेचा मोठा हिस्सा आखाती देशांतून आयात करतो, त्यामुळे येथील हालचालींचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणूनच आता भारताला स्वतःच्या ऊर्जा स्रोतांसाठी पर्याय शोधणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ रशिया, अमेरिका, आफ्रिका किंवा रिन्यूएबल एनर्जीकडे जलदगतीने वाटचाल करणे. तसेच 'स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह' (धोरणात्मक तेल साठा) अधिक मजबूत करावा लागेल, जेणेकरून संकटाच्या वेळी देशाकडे पाठबळ उपलब्ध असेल.
संरक्षण आत्मनिर्भरता: परदेशी शस्त्रांच्या पलीकडे विचार करण्याची वेळ
या संघर्षाने आणखी एक स्पष्ट संदेश दिला आहे. आधुनिक युद्ध केवळ सैनिकांच्या बळावर नाही, तर तंत्रज्ञानाच्या जोरावर लढली जातात. यामध्ये ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि एअर डिफेन्स सिस्टिमची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. भारत अजूनही मोठ्या प्रमाणात परदेशी शस्त्रास्त्रांवर अवलंबून आहे, जे संकटाच्या वेळी जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे आता स्वदेशी संरक्षण उत्पादन, ड्रोन तंत्रज्ञान आणि मजबूत एअर डिफेन्स इकोसिस्टमवर वेगाने काम करण्याची गरज आहे, जेणेकरून कोणत्याही परिस्थितीत भारत आत्मनिर्भर राहील.
आर्थिक सुरक्षा: जागतिक धक्क्यांपासून बचावाची तयारीमध्यपूर्वेतील तणाव वाढताच त्याचे पडसाद जागतिक बाजारपेठ आणि तेलाच्या किमतींवर उमटले, ज्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर झाला. यावरून हे स्पष्ट झाले की, भारताला आपली अर्थव्यवस्था बाहेरील धक्क्यांपासून वाचवण्यासाठी अधिक आर्थिक लवचिकता (Financial Resilience) निर्माण करावी लागेल. यासोबतच चाबहार बंदर किंवा इंटरनॅशनल कॉरिडॉर यासारख्या पर्यायी व्यापार मार्गांचा विकास करणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही एका क्षेत्रावरील अवलंबित्व कमी होऊ शकेल.
भारत नेहमीच 'वसुधैव कुटुंबकम' आणि नैतिक नेतृत्वाबद्दल बोलत आला आहे, पण बदलत्या जागतिक राजकारणात केवळ नैतिकतेच्या आधारावर निर्णय घेणे सोपे नाही. अमेरिका-इराण यासारख्या संघर्षात भारताला अत्यंत संतुलित भूमिका घ्यावी लागते. जिथे एकीकडे त्याचे धोरणात्मक हितसंबंध आहेत, तर दुसरीकडे त्याची जागतिक प्रतिमा पणाला लागलेली असते. अशा स्थितीत भारताला आपल्या परराष्ट्र धोरणात व्यावहारिकता आणि तत्त्वे यांच्यात योग्य समन्वय साधावा लागेल.
चीन-पाकिस्तान फॅक्टर: संधीच्या शोधात असलेले शेजारी
जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर अस्थिरता वाढते, तेव्हा चीन आणि पाकिस्तान यासारखे देश स्वतःचे हित साधण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत भारताला दुहेरी आव्हानाचा सामना करावा लागू शकतो; एकीकडे बाह्य संकट आणि दुसरीकडे सीमेवर वाढणारा दबाव. त्यामुळे भारताला केवळ जागतिक स्तरावर सतर्क राहून चालणार नाही, तर आपल्या शेजारील देशांच्या संदर्भातही मजबूत धोरणात्मक तयारी ठेवावी लागेल.
(नक्की वाचा: Ceasefire News: खामेनेईंच्या निधनाचा 40 दिवसांचा शोक, याच दिवशी थांबलं युद्ध! इराणमध्ये 9 एप्रिलला घडणार मोठी गोष्ट?)
युद्धविराम: एक संधी आणि इशाराही
इराण-अमेरिका यांच्यातील युद्धविरामाने तात्पुरता दिलासा दिला असला, तरी आजच्या जगात कोणताही देश पूर्णपणे सुरक्षित नाही, याची जाणीव भारताला करून दिली आहे. उर्जेपासून संरक्षणापर्यंत आणि मुत्सद्देगिरीपर्यंत प्रत्येक आघाडीवर तयारी आणि समतोल हीच भविष्याची गुरुकिल्ली आहे. हा युद्धविराम म्हणजे केवळ युद्धाचा अंत नाही, तर भारतासाठी एक संकेत आहे की येणाऱ्या काळात आपली रणनीती अधिक मजबूत करणे हीच काळाची गरज असेल.