
Iran-Israel conflict : इस्रायलकडून इराणमधील वेगवेगळ्या ठिकाणांवर सतत बॉम्बफेक केली जात आहे. आज (16 जून) इस्रायलनं मध्य, पूर्व आणि पश्चिम इराणमधील अनेक ठिकाणांना लक्ष्य करत बॉम्बहल्ले केले. तेहरानमध्ये तर थेट प्रक्षेपण सुरू असताना सरकारी वृत्तवाहिनीच्या मुख्यालयावरही बॉम्ब टाकण्यात आले, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक महिला अँकर बातमी सांगत असतानाच मोठा स्फोट होतो आणि ती स्वतःचा जीव वाचवून पळताना दिसत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
इराणचा आरोप आहे की इस्त्रायलने उत्तर-पूर्व इराणमधील निवासी इमारतींना लक्ष्य केले असून, हा एक मोठा हल्ला होता. इराणने असाही दावा केला आहे की इस्त्रायलच्या या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 224 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून, शेकडो लोक जखमी झाले आहेत.
इराणमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे पोर्तुगाल, फिलिपिन्स, फिनलंड आणि इतर देशांमधील नागरिक अस्तारा सीमेमार्गे अझरबैजानची राजधानी बाकू येथे पोहोचत आहेत. जेणेकरून तिथून विमानाने ते आपल्या देशात परत जाऊ शकतील.
( नक्की वाचा : Iran-Israel conflict : '.... तर पाकिस्तान इस्रायलवर अणुबॉम्ब टाकेल',युद्ध चिघळणार? )
याउलट, इस्त्रायलचा दावा आहे की त्यांनी इराणमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक केली आहे. त्यांच्या मते, इराणच्या एक तृतीयांश जमिनीवरून मारा करणारी क्षेपणास्त्रं (surface-to-surface missiles) नष्ट करण्यात आली आहेत.
इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलचेही मोठे नुकसान
दुसरीकडे, इराणही त्यांच्याकडील क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर सातत्याने हल्ले करत आहे. इराणच्या या हल्ल्यांमुळे तेल अवीवचे मोठे नुकसान झाले आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे आणि ५०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
त्याचबरोबर, इराणच्या हल्ल्यात इस्रायलच्या बेनेई ब्राक शहरालाही मोठा फटका बसला आहे. इराणच्या या हल्ल्यात मोठ्या संख्येने इमारती आणि वाहनं उद्ध्वस्त झाली आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world