
हमास या दहशतवादी संघटनेचा गाझा प्रमुख मोहम्मद सिनवार (Mohammad Sinwar) याला इस्रायलच्या सैनिकांनी ठार मारले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी बुधवारी (28 मे) ही घोषणा केली. 14 मे रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यात तो राहत असलेल्या ठिकाणाला लक्ष्य करण्यात आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बोगद्यात लपला होता सिनवार
मोहम्मद सिनवार हा हमासचा माजी प्रमुख याह्या सिनवार याचा भाऊ होता. याह्याला इस्त्रायली सैन्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये ठार केले होते. गाझामधील हमासच्या शेवटच्या उरलेल्या टॉप कमांडर्सपैकी एक असलेला मोहम्मद सिनवार एका भूमिगत ठिकाणी लपलेला होता, ज्याचा वापर दहशतवादी गट कमांड सेंटर म्हणून करत होता. 14 मे रोजी इस्त्रायलच्या संरक्षण दलांनी ड्रोन हल्ल्यात त्याला लक्ष्य केले होते. हे कमांड सेंटर खान युनिसमधील युरोपियन रुग्णालयाच्या खाली होते.
इस्त्रायली सैन्याने अचूक हल्ल्यानंतरचा एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या खाली एक बोगदा दिसत होता, जो हमासच्या ठिकाणापर्यंत जात होता. पंतप्रधान नेतन्याहू यांनी इस्त्रायलच्या संसद नेसेटमध्ये सांगितले की, 'आम्ही मोहम्मद सिनवारला संपवले आहे.' ते पुढे म्हणाले की, ' इस्रायलने इस्माईल हनीया, मोहम्मद देइफ, याह्या सिनवार आणि आता मोहम्मद सिनवार यांना संपवले आहे.'
( नक्की वाचा : ज्योती मल्होत्राचा थेट होता ISI शी संपर्क, पाकिस्तानात AK 47 घेऊन... नव्या Video मधून अनेक रहस्य उघड )
ऑपरेशन 'द शॅडो'
इस्रायलने मोहम्मद सिनवारला 'द शॅडो' असे नाव दिले होते. 1975 मध्ये खान युनिसमधील एका निर्वासित छावणीत जन्मलेला सिनवार हमासमध्ये खूप शक्तिशाली नेता होता. ऑक्टोबरमध्ये त्याचा भाऊ याह्या याच्या मृत्यूनंतर, इस्त्रायली सैन्याने आपल्या नेत्यांना लक्ष्य करू नये म्हणून हमासने गव्हर्निंग काउंसिलची स्थापना केली होती. मोहम्मद या काउंसिलचा एक महत्त्वाचा नेता बनला होता, जो आपल्या भावाच्या मृत्यूनंतर तिला मजबूत करण्याचा प्रयत्न करत होता.
गाझा शहरात नुकत्याच झालेल्या ओलीस अदलाबदलीदरम्यान मोहम्मदचा मोठा प्रभाव दिसून आला होता. गणवेशात असलेल्या हमासच्या लढवय्यांनी चार इस्त्रायली ओलिसांना पॅलेस्टाईन चौकात फिरवले, तर समर्थक आनंदाने ओरडत होते. एका वर्षापेक्षा जास्त काळ सुरू असलेल्या सततच्या संघर्षानंतरही हमासला पूर्णपणे संपवण्यात इस्त्रायल असमर्थ आहे. सिनवारने संघटनेला पुन्हा मजबूत केले आहे, असा दावा संबंधित तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. पण, इस्रायलने या सर्व अंदाजांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world