खोटी कंपनी बनवली आणि 'पप्पू' पेजरला बॉम्ब बनवण्यासाठी इस्रायलनं वापरलं असं डोकं की...

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Israel And Hezbollah : युद्ध हे फक्त शस्त्रांनी नाही तर डोक्यानंही जिंकलं जातं, अशी जुनी म्हण आहे. इस्रायलनं लेबनानमध्ये हिजबुल्लाहसोबतही तेच केलं. त्याचं उदाहरण या आठवड्यात सर्व जगाला दिसलं आहे. लेबनानमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या पेजर स्फोटामध्ये 12 दहशतवादी मारले गेले तर 4000 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.  तर दुसऱ्या दिवशी वॉकी-टॉकी आणि सोलर पॅनलमध्ये झालेल्या स्फोटात 25 जण ठार तर शेकडो जण जखमी झाले. हिजबुल्लाहनं या हल्ल्याच्या मागे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादचा हाथ असल्याचा आरोप केलाय. तर इस्रायलनं या स्फोटाची थेट जबाबदारी अद्याप घेतलेली नाही. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

लेबनानमध्ये झालेल्या या स्फोटाबाबत न्यूयॉर्क टाईम्सनं मोठा गौप्यस्फोट केला आहे. या वृत्तपत्रानुसार हिजबुल्लाह मोसादच्या सायबर ऑपरेशनचा बळी ठरलंय. हिजबुल्लाहनं खरेदी केलेले पेजर तैवानच्या अपोलो गोल्ड कंपनीचे नव्हते. ही तैवानची कंपनी असल्याची  हिजबुल्लाहची समजूत होती. वास्तविक मोसादच्या अधिकाऱ्यांनी ही कंपनी हिजबुल्लाहची दिशाभूल करण्यासाठी बनवलेली एक फ्रंट कंपनी होती. ही कंपनी तयार करण्यासाठी मोसादनं अनेक वर्षांपासून प्लॅनिंग केलं होतं.  

2022 पासून सुरु होती खरेदी

पेजर आणि वॉकी-टॉकीच्या माध्यमातून हिजबुल्लाहला हादरा देण्याची तयारी इस्रायलकडून अनेक वर्षांपासून सुरु होती. पण, हिजबुल्लाहला याचा सुगावा लागला नाही. हिजबुल्लाह इस्रायलच्या या कंपनीकडून 2022 पासून पेजर खरेदी करत होते.  

( नक्की वाचा : पेजरनंतर वॉकी-टॉकीमुळे हादरलं Lebanon, अनेकजण जखमी, पाहा Video )
 

हिजबुल्लाहचा इस्रायलवर विश्वास बसला. लेबनानमधील हिजबुल्लाहचे दहशतवादी या कंपनीकडून पेजर आणि अन्य उपकरणांची सातत्यानं मागणी करत होते. त्यावेळी मोसादनं पेजरमध्ये पीईटीएन स्फोटकं टाकले. हिजबुल्लाहला कोणताही संशय येऊ नये यासाठी इस्रायलनं आणखी दोन शेल कंपन्या बनवल्या होत्या. 

जेम्स बॉन्ड स्टाईलनं झाला हल्ला

इस्रायलनं एखाद्या चित्रपटाच्या प्रसंगासारखं हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना लेबनानमध्ये ठार केलं. हा एखादा जेम्स बॉन्डच्या सिनेमात शोभेल असा सिन आहे, असं या हल्ल्याचं वर्णन ऐकून वाटत आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे अनेक दहशतवादी मारले गेले. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पेज बॉम्ब स्फोटामागे अनेक वर्षांचे कष्ट आहेत, हे स्पष्ट आहे. स्पलाय चेनमध्ये घुसखोरी करण्यात आली होती. लेबनानमध्ये आयत होणाऱ्या शेकडो पेजरमध्ये स्फोटकं भरण्यात आले होते. अर्थात याबाबत आतापर्यंत खूप कमी पुरावे समोर आले आहेत. 

हिजबुल्लाहकडून पेजरचा वापर का होतो?

हिजबुल्लाहनं त्यांच्या दहशतवाद्यांना मोबाईल फोन न वापरण्याची सूचना काही महिन्यांपूर्वीच केली होती. त्यांनी मोबाईलच्या जागी पेजरवर भर दिला होता. इस्रायलची मोसाद ही गुप्तचर संस्था मोबाईल फोन ट्रॅक करु शकते. पण पेजरला ट्रॅक करणे इतकं सोपं नाही, हे इस्रायलला माहिती आहे. पेजर तयार करण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ते अतिशय जुनं आहे. त्यामुळे त्याचा कुठं वापर होतोय, हे समजणे अवघड आहे. 
 

Topics mentioned in this article