MH370 विमान बेपत्ता कसं करायचं हे वैमानिकाला माहिती होतं, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ

हे विमान शोधण्यासाठी 4 वर्ष प्रयत्न करण्यात आले, 1500 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला तरीही हे विमान सापडले नाही.

जाहिरात
Read Time: 4 mins
बीजिंग:

10 वर्षांपूर्वी क्वालालांपूरहून बिजींगला निघालेलं मलेशिअन एअरलाईन्सचं MH370 विमान अचानक बेपत्ता झालं होतं. हे विमान बेपत्ता कसं झालं याचा अजूनही शोध लागू शकलेला नाही. या विमानामध्ये 239 प्रवासी होते. आजवर ना या विमानाचे अवशेष सापडलेत ना विमानातील प्रवाशांचे किंवा वैमानिक आणि इतर हवाई कर्मचाऱ्यांचे मृतदेहही सापडले नाहीत. गेली चार वर्ष माजी हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक जीन ल्युक मार्चंड आणि निवृत्त वैमानिक पॅट्रीक ब्लेली यांनी हे विमान बेपत्तता कसं झालं आणि ते कुठे गेलं याचा शोध लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या दोघांनी बोईंग 777 च्या प्रतिरुपाचा म्हणजेच सिम्युलेटरचा वापर करून बेपत्ता विमानाच्या माहिती असलेल्या शेवटच्या हवाई मार्गाची पद्धती आणि विमानाचे नियंत्रण करणाऱ्या ज्या कोणी व्यक्ती होत्या त्यांच्या मानसिकतेचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांना दिसून आलं की हे विमान मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत पोहोचल्यानंतर रडारवरून दिसेनासं झालं होतं.

बीबीसीने व्हाय प्लेन्स व्हॅनिश: द हंट फॉर MH370 नावाचा माहितीपट तयार केला आहे. यामध्ये माजी हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक जीन ल्युक मार्चंड आणि निवृत्त वैमानिक पॅट्रीक ब्लेली यांनी सांगितले की हे विमान आता बेपत्ता झाले असून त्याचा कधीही शोध लागू शकत नाही. या दोघांनी म्हटले ही ज्याने कोणी हे केलं आहे तो अतिशय हुशार माणूस असावा. जिथे हे विमान बेपत्ता झाले तो भाग क्वालालांपूर आणि व्हिएतनाममधील कृष्णविवरासारखा आहे. (ब्लॅकहोल ) या विमानातून आपण संकटात असल्याचा किंवा मदत हवी असल्याचा संदेश मिळाला नव्हता. आश्चर्याची बाब ही आहे की या विमानाचा निर्धारीत मार्ग बंद करण्यात आला होता आणि हे विमान त्यानंतर 7 तास उडत होतं. या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क मानवी पद्धतीने बंद करण्यात आला होता.  यामुळे विमानातील कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येत नव्हता. मग अचानक हे विमान बेपत्ता झालं आणि या बेपत्ता झालेल्या विमानाने जगभर खळबळ उडवून दिली.

8 मार्च 2014 रोजी हे विमान बिजींगच्या दिशेने झेपावले होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. विमानाने उड्डाण करून 38 मिनिटे उलटून गेली होती. यानंतर कॅप्टनचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी शेवटचे बोलणे झाले. त्यांचे शेवटचे शब्द होते, गुड नाईट मलेशियन 370. यानंतर त्यांनी व्हिएतनामी एअर स्पेस कंट्रोलरशी संपर्क साधणे अपेक्षित होते.  मात्र अचानक हे विमान बेपत्ता झाले. बेपत्ता होण्यापूर्वी या विमानाने यु-टर्न घेतला होता. यावेळी विमानामधून समस्या उद्भवल्याचा किंवा मदतीसाठी कोणताही संदेश पाठवण्यात आला नव्हता. यानंतर हे विमान हिंदी महासागरात कुठेतरी कोसळले असावे असा अंदाज  वर्तवण्यात येत आहे.


जीन ल्युक यांच्या म्हणण्यानुसार "या विमानाने अनेकदा त्याची उंची आणि वेग बदलला होता. या विमानाने अनेक वळसे घातले होते, ज्यावरून वैमानिक हा शेवटपर्यंत कार्यरत होता हे दिसून येतं.  विमानाने युटर्न घेणं हे अत्यंत आव्हानात्मक होतं कारण त्यांना झटक्यात व्हिएतानमच्या क्षेत्रातून गायब व्हायचं होतं. यासाठी अत्यंत कुशलतेची गरज असते. माझ्या मते हा अपघात नव्हता. कुशल वैमानिकच हे करू शकतो याची आम्हाला खात्री पटली आहे. त्यांनी विमान गायब कसं होईल याची खात्री केली, विमानाचा पत्ता लागणार नाही याची खात्री केली आणि पाठलाग होणार नाही याचीही खात्री केली होती."   कॅप्टन झहारी अहमद शाह आणि सह वैमानिक फरीक  अब्दुल हमीद हे विमानाचे सारथ्य करत होते.
 

Advertisement


कॅप्टन झहारीने सिम्युलेटरवर विमान बेपत्ता होण्याच्या एक महिना आधी दक्षिण हिंदी महासागरातील दुर्गम भागावरून विमान उडवण्याचा सराव केला होता. विमानातून प्रवाशांना मारून आत्मघात करण्यासाठी कॅप्टन झहारीने हे सगळं घडवून आणल्याचा आरोप केला जात होता, मात्र मलेशिया सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते.  ऑस्ट्रेलियाच्या वाहतूक सुरक्षा मानक संस्थेने विमान बेपत्ता होण्याच्या काही मिनिटांपूर्वी वैमानिक बेशुद्ध झाला होता आणि विमान नियंत्रणाबाहेर गेले होते असे म्हटले होते.

हे विमान शोधण्यासाठी 4 वर्ष प्रयत्न करण्यात आले, 1500 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला तरीही हे विमान सापडले नाही. 120000 स्क्वेअर मीटरचा परीसर खंगाळण्यात आला मात्र या विमानाचा एकही अवशेष सापडला नाही. यामुळे या विमानाचे काय झाले याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

Advertisement
Topics mentioned in this article