Brother Sister Marriage in Islam : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडाच्या रॅलीमध्ये डेमोक्रेटिक खासदार इल्हान उमर यांच्याविरोधात धक्कादायक दावा केला आहे. ट्रम्प रॅलीदरम्यान म्हणाले, डेमोक्रेटिक खासदार इल्हान उमर यांनी आपल्या भावासोबत लग्न केलं आहे. व्यासपीठावर असताना ट्रम्प म्हणाले, इल्हान उमर यांनी आपल्या भावाशी लग्न केलं आणि हे अवैध आहे. या घटनेनंतर इस्लाममधील भावा-बहिणींमधील लग्नाबाबत चर्चा रंगू लागली आहे.
इल्हान उमरच्या लग्नाचं काय आहे सत्य?
अमेरिकेचे मिनेसोटाचे डेमोक्रेटिक खासदार इल्हान उमर यांच्याबाबत केलेले हे दावे नवे नाहीत. २०१६-२०१८ च्या जवळपास उजव्या विचारसरणीचे ब्लॉगर्स आणि सोशल मीडियावर उमर यांनी भावासोबत लग्न केल्याची बाब पसरली होती. मात्र ही एक अफवा आहे.
भाऊ-बहिणीच्या लग्नाबाबत कुराणमध्ये काय म्हटलंय?
इस्लाममध्ये सख्ख्या भावंडांमधील निकाह स्पष्टपणे महरम (निषिद्ध) मानलं आहे. कुरानच्या सूरह अन-निसा (४:२३) मध्ये महरम नातेवाईकांची (ज्यांच्याशी विवाह कायमचा निषिद्ध आहे) यादी दिली आहे. त्यात म्हटलं आहे की…
"तुमच्या माता, तुमच्या मुली, तुमच्या बहिणी, तुमच्या वडिलांच्या बहिणी, तुमच्या आईच्या बहिणी, तुमच्या भावाच्या मुली, तुमच्या बहिणीच्या मुली, ज्या मातांनी तुमचे पालनपोषण केले त्या, तुमच्या दत्तक बहिणी..." यासह आयतमध्ये भाऊ-बहिणीच्या विवाहावर स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे. इस्लाममध्ये विवाहाची पवित्रता, वंशाचे संरक्षण आणि सामाजिक नीतिमत्तेवर भर देण्यात आला आहे. जवळच्या रक्ताच्या नात्यातील विवाह हे सर्वात घोर पापांपैकी एक मानलं जातं.
नक्की वाचा - बोहरा मुस्लिमांमध्ये मुलींचा खतना का केला जातो? कोवळ्या वयातच घडणारी प्रथा काय आहे?
कुराण आणि हदीसमध्ये स्पष्ट निषेध...
सूरह अन् निसा 4:22-23 मध्ये वडिलांची पत्नी, आई, मुलगी, बहीण यांच्यासोबत विवाह हराम मानण्यात आला आहे. हदीसमध्ये पैगंबर मोहम्मदांनीही महरमशी संबंध गंभीर पाप मानण्यात आलं आहे. इस्लामच्या अभ्यासकांनुसार, भाऊ-बहिणींमधील संबंध सर्वात मोठा गुन्हा आहे. कारण यामुळे रक्ताचं नातं तुटतं.
इस्लाममध्ये कोणा-कोणामध्ये लग्नास परवानगी?
इस्लाममध्ये चुलत भाऊ-बहिणींमधील लग्नास परवानगी असते. कुराणमध्ये यास रोख नाही. मात्र रक्ताच्या नात्यातील भाऊ-बहिणींमधील लग्न हराम मानले जातात. रक्ताच्या नात्यासह दुधाच्या नात्यातील विवाह निषिद्ध मानण्यात आले आहेत. म्हणजेच जर कोणी महिला आणि पुरुषांमध्ये कोणतंही नातं नसलं, मात्र जर दोघांनी एकाच आईच दूध प्यायलं असेल तरीही त्यांच्यातील लग्न निषिद्ध मानलं जातं.
इस्लाममध्ये लग्नाचे नियम काय आहेत?
इस्लाममध्ये निकाह सहमती, समानता, मेहर आणि नैतिकतेनर आधारित आहे. कुराणमध्ये शांती आणि प्रेमाचा उल्लेख आहे. मुस्लीम समाजात सख्खे भाऊ-बहिणीमधील लग्नाची परंपरा नाही. तर यावर सामाजिक बहिष्कार घातला जाऊ शकतो.
खरं तर, प्राचीन काळी, इजिप्तसारख्या काही संस्कृतींमध्ये राजघराण्यांमध्ये सगोत्र संबंध सामान्य होता. विवाह सामान्यतः भावंडे, आई, मुलगे आणि वडील यांच्यात होत असत. ही प्रथा रक्ताची शुद्धता राखण्याशी जोडलेली होती, परंतु इस्लामने ती समूळ नष्ट केली. आधुनिक विज्ञानातदेखील सगोत्र संबंध अनुवांशिक विकारांशी जोडलं गेलं आहे.