हाँगकाँगमध्ये बुधवारी दुपारी एक मोठा अपघात घडला. येथील एका निवासी भागात आठ उंच इमारतींना आग लागली. या इमारतींमध्ये दोन हजार फ्लॅट्समध्ये हजारो लोक अडकले होते. लोक बचावासाठी धावा करीत होते. हजारो लोकांना यामध्ये वाचविण्यात यश आले, मात्र ४४ जणांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. तर शेकडो लोक बेपत्ता आहेत. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलं आहे.
इतका भीषण अपघात कसा झाला, कोणाची चूक?
या हाऊसिंग सोसायटीत एकूण ८ इमारती आणि दोन हजार फ्लॅट्स असणारी मोठी सोसायटी आहे. ज्यामध्ये ४६०० हून अधिक लोक राहतात. या मोठ्या संख्येने वृद्धांचा समावेश आहे. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, त्याचा तपास सुरू आहे.
फायर ब्रिगेड विभागातील एक अधिकारी चाऊ विंग-यिन यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं, या अपघातात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेचे धक्कादायक व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओवरुन अपघाताची दाहकता लक्षात येते. ७०० हून अधिक अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार, हाँगकाँगच्या ज्या हाऊसिंग सोसायटीमध्ये आग लागली त्याचं नाव वांग फुक कोर्ट आहे. या कॉम्प्लेक्समध्ये ८ ब्लॉक्स आहेत. यामध्ये एकूण २००० फ्लॅट्स आहेत. ही आग दुपारी २ वाजून ५१ मिनिटांनी लागली होती. ज्यानंतर अग्निशमन दलाला याबाबत सूचना देण्यात आली.
आगीत ४४ जणांचा मृत्यू...
या आगीच्या घटनेत साधारण ४४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जीव गमावणाऱ्यांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानाचाही समावेश आहे.