बेडवर शांत आणि चांगली झोप लागण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. अनेक लोकांना झोपताना नाकाने श्वास घेण्याऐवजी तोंडाने श्वास घेण्याची सवय असते. हे टाळण्यासाठी सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे. त्या ट्रेंडचं नाव आहे माउथ टेपिंग. याचा अर्थ झोपताना आपल्या तोंडावर पट्टी चिकटवणे. जेणेकरून शरीराला तोंडाने श्वास घेण्याचा पर्यायच राहणार नाही. आपोआप व्यक्ती नाकाने श्वास घेऊ लागेल. मात्र असे दिसून आले आहे की, झोपताना तोंडाने श्वास घेण्यापासून रोखण्यासाठी तोंडावर पट्टी लावल्याने गुदमरण्याचा धोका होऊ शकतो. तर हा सोशल मीडिया ट्रेंड काय आहे हे जाणून घेवूया.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोशल मीडियाचा नवीन ट्रेंड, लोक काय करत आहेत?
टिकटॉक आणि इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्रेंड व्हायरल होत आहे. या ट्रेंडचे नाव आहे माउथ टेपिंग ट्रेंड. हा ट्रेंड "तोंडी श्वासोच्छ्वास" रोखण्यासाठी आणि झोपेच्या वेळी नाकाने श्वास घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी तोंडावर टेप लावण्यात येते. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि सेलिब्रिटी यांनी दावा केला आहे की तोंडावर टेप लावल्याने चांगली झोप येते. तोंडाचे आरोग्य सुधारते आणि व्यक्ती लवकर वृद्ध होत नाहीत असा त्यांचा दावा आहे.
अभ्यासात काय उघड झाले?
इंडिपेंडेंटच्या अहवालानुसार, याबाबत एक संधोधन करण्यात आले आहे. त्यामध्ये या विषयावर केलेल्या मागील 10 अभ्यासांचे मूल्यांकन करण्यात आले. यात एकूण 213 रुग्णांमध्ये टेप किंवा चिन स्ट्रॅपसारख्या इतर उपकरणांचा किंवा तंत्रांचा वापर करून तोंड बंद केल्याने काय फायदे होतात, असे निदर्शनास आले.
10 पैकी दोन संशोधनातून असे दिसून येते की तोंडावर टेप लावल्याने सौम्य ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया असलेल्या लोकांच्यामध्ये किरकोळ सुधारणा होऊ शकते. परंतु इतर अभ्यासांमध्ये असे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, की यामुळे तोंडी श्वासोच्छ्वास, झोपेतील श्वासोच्छ्वास किंवा स्लीप एपनियाच्या उपचारात मदत होते. 10 पैकी चार संशोधकांनी याबाबत गंभीर इशारा दिला आहे. ज्या लोकांना नाकाने श्वास घेता येत नाही आणि जर त्यांनी झोपेच्या वेळी तोंड बंद करण्यासाठी पट्टी लावली तर ते गुदमरू शकतात. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की अशा नाकाने श्वास न घेता येण्या मागे काही कारणे आहेत. त्यात फीवर, क्रोनिक राइनाइटिस, साइनोनासल किंवा वाढलेले टॉन्सिल याचा समावेश आहे. जर तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या आधीपासून असेल आणि तुम्ही हा ट्रेंड फॉलो करत असाल तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते.
अहवालानुसार, या संशोधनात ब्रायन रोटेनबर्ग यांनी म्हटले आहे की "सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएंसर वैज्ञानिक पुराव्याशिवाय तोंडावर टेप लावण्याचे समर्थन करत आहेत. ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. "त्यांनी लिहिले, "अनेक लोकांसाठी तोंडावर टेप लावणे योग्य नाही. त्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होवू शकतात. तर डॉ. रोटेनबर्ग यांनी सांगितले की, "हे लोक नकळतपणे त्यांची लक्षणे बिघडवत आहेत. त्यामुळे हृदयरोगासारखा गंभीर धोका निर्माण होवू शकतो. जेस री यांनी म्हटले आहे की "आपल्याला मजबूत वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित आरोग्य संबंधी निर्णय घेण्याची गरज आहे. आम्हाला आशा आहे की लोक झोपेच्या वेळी त्यांच्या तोंडावर टेप लावणे थांबवतील, असं करणं हे धोकादायक आहे हे त्यांना समजेल."