सिंगापूर आणि हाँगकाँगनंतर आता नेपाळनेही भारतातील मसाला निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांना झटका दिला आहे. नेपाळने MDH आणि एवरेस्ट मसाला कंपन्यांच्या उत्पादनांच्या आयात आणि विक्रीवर स्थगिती आणली आहे. तेथे पोहोचलेला मसाल्याचा कंटेनरही बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात आला नाही. याशिवाय नेपाळमधील दुकानांमधील मसालेही विकता येणार नाहीत.
कोणी दिला आदेश?
वृत्त संस्था ANI ने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने MDH आणि Everest सारख्या कंपन्यांच्या काही प्रॉडक्टमध्ये किटकनाशक, एथिनील ऑक्साइड असल्याचा संशय असल्याने निर्णय घेतला आहे. नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून या दोन्ही कंपन्यांच्या प्रॉडक्टरची तपासणी केली जात आहे.
कर्करोगाची भीती...
नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाचे प्रवक्ता मोहन कृष्ण महाराजनने दिलेल्या माहितीनुसार, MDH आणि Everest कंपन्यांच्या मसाल्यांना नेपाळमधील आयातीत सध्या सात दिवसांसाठी बंदी आणण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मसाल्याच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यात एथिनील ऑक्साइडची तपासणी केली जात आहे.ऑक्साईड निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त असेल तर कर्करोगाचा धोका वाढतो.
नक्की वाचा - अमेरिकेत पॅलेस्टाईनच्या पाठिराख्यांचे आंदोलन, भारतीय वंशाच्या तरुणीला अटक
सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही आणली बंदी...
यापूर्वी सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही या दोन मसाला कंपन्यांच्या काही प्रॉडक्टवर कारवाई करण्यात आली आहे. हाँगकाँगच्या खाद्य नियामक सेंटर फॉर फूड सेफ्टीने सांगितल्यानुसार, या दोन्ही कंपन्यांच्या प्रॉडक्टमध्ये एथिनील ऑक्साइड आहे, ज्यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. हाँगकाँगने MDH आणि Everest च्या चार मसाला उत्पादकांवर बंदी आणली होती.