
तृप्ती पालकर, प्रतिनिधी
भारताचा सख्खा शेजारी असलेल्या नेपाळमधील नागरिक सध्या रस्त्यावर उतरलेत. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या छोट्या देशात या प्रकारची आंदोलनं नवी नाहीत. पण, या आंदोलनात माजी राजे ज्ञानेंद्र सक्रीय झाले आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडं सर्वांचं लक्ष लागलंय. नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजेशाही यावी या मागणीसाठी देशातील सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्याचवेळी नेपाळ सरकारनं या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचं खापर भारतावर फोडलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेपाळमध्ये काय घडतंय?
नेपाळचे माजी राजा ज्ञानेंद्र बीर ब्रिकम शाह यांचं शनिवारी राजधानी काठमांडूमध्ये भव्य स्वागत झाले. ते नेपाळमधील तीर्थयात्रा करुन परतले होते. माजी राजांचं स्वागत करण्यासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. काठमांडूमधील त्रिभूवन विमानतळ ते ज्ञानेंद्र यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'निर्मल निवास' पर्यंतचा पाच किलोमीटर पर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना जवळपास अडीच तास लागले.

नेपाळी नागरिकांनी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला उभं राहत ज्ञानेंद्र यांचे स्वागत केले. यामध्ये तरुणांची संख्या मोठी होती. ,'नारायणहिटी खाली गर, हाम्रो राजा आउंदै छन' (नारायणहिटी रिकामं करा. आमचे राजे येत आहेत) अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. नारायणहिटी पॅलेस माजी राजे ज्ञानेंद्र यांचे माजी निवासस्थान आहे. काठमांडूमध्ये त्यांच्या भव्य स्वागतानंतर नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही येणार ही चर्चा सुरु झाली आहे.
( नक्की वाचा : Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का? )
16 वर्षांमध्ये 13 सरकार
नेपाळमध्ये 2006 साली अशाच पद्धतीने आंदोलन झाले होते. त्यामध्ये ज्ञानेंद्र यांना राजगादी सोडावी लागली होती. राजेशाहीला कंटाळलेल्या नागरिकांनी लोकशाही स्विकारण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतरच्या 16 वर्षांमध्ये (2008 ते 2025) नेपाळमध्ये 13 सरकारची स्थापना झाली. विविध पक्षांनी सत्ता स्थापन केली खरी, मात्र कुणालाही या देशाला प्रगतीपथावर नेता आलं नाही
उलट देश कर्जबाजारी होत राहिला आणि भ्रष्टाचार बोकाळला,याच अस्थिरलेला कंटाळलेले लोकं आता पुन्हा राजेशाहीला समर्थन करत आहे.
योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर
नेपाळमध्ये माजी राजांचं स्वागत करण्यासाठी जमा झालेल्या गर्दीतील काही जणांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा असलेले योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर झळकावले. योगींच्या फोटोमुळे नेपाळमध्ये नवा वाद सुरु झाला आहे. नेपाळमधील राजकीय पक्षांनी माजी राजे सक्रीय होण्यामागे भारताचा हाथ असल्या आरोप केलाय. स्थानिक प्रशासनानं राजधानी काठमाडूंमधील काही भागांमध्ये पुढील दोन महिन्यासाठी जमावबंदी लागू केलीय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) बऱ्याच काळापासून नेपाळमद्ये सक्रीय आहे. रा.स्व. संघाचे नेपाळच्या राजघराण्याशी मधुर संबंध आहेत. नेपाळमध्ये माओवादी सरकार आल्यानंतरही संघाची सक्रीयता कमी झालेली नाही. नेापाळमधील मधेश म्हणजे मैदानी प्रदेशात गेल्या काही वर्षांमध्ये हिंदू -मुस्लीम यांच्यातील वादाच्या घटना उघड झाल्या आहेत. या वादामध्येही रा.स्व. संघाचे नाव आले होते. नेपाळमधील मधेश भागात संघ कामाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झालाय.
पुन्हा राजेशाही येणार का?
ज्ञानेंद्र यांनी राजेशाही परत आणण्याच्या आवाहनांवर भाष्य केलेले नाही. माजी राजाला वाढता पाठिंबा असूनही, ज्ञानेंद्र यांना लगेच सत्तेत परत येण्याची शक्यता कमी आहे.2002 मध्ये, त्यांच्या भावाची आणि कुटुंबाची राजवाड्यात हत्याकांड झाल्यानंतर ते राजा झाले. 2005 पर्यंत त्यांनी कार्यकारी किंवा राजकीय अधिकारांशिवाय संवैधानिक प्रमुख म्हणून राज्य केले, त्यानंतर त्यांनी पूर्ण सत्ता हस्तगत केली. त्यांनी सरकार आणि संसद बरखास्त केली, राजकारणी आणि पत्रकारांना तुरुंगात टाकले आणि संपर्क तोडला, आणीबाणीची स्थिती जाहीर केली आणि देशावर राज्य करण्यासाठी सैन्याचा वापर केला.
नेपाळमधील क्रांतीनंतर जन्म झालेल्या पिढीनं राजेशाही पाहिलेली नाही. या वर्गाचा माजी राजे ज्ञानेंद्र यांना पाठिंबा मिळणार का? नेपाळच्या मुख्य प्रवाहातील राजकीय पक्ष तसं होऊ देतील का? या प्रश्नांचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला आणखी वाट पाहावी लागेल.