
Pakistan Train Hijack: जगभरातील विशेषत: भारतामधील दहशतवाद्यांचं केंद्र असलेल्या पाकिस्तानला देखील दहशतवादाची झळ वारंवार बसली आहे. भारतीय फुटीरतावादी शक्तींना चिथावणी देणाऱ्या पाकिस्तानमध्येही त्यांच्या देशातून बाहेर पडून नवा देश निर्माण करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या संघटना आहेत. या संघटनांमध्ये बलोच लिबरेशन आर्मी (Baloch Liberation Army, BLA) या संघटनेचा वरचा क्रमांक आहे. पाकिस्तान सरकारसाठी ही दहशतवादी संघटना आहे. पण, आपण बलूचिस्तानच्या स्वतंत्रतेसाठी झटणारी संघटना आहोत असा या लिबरेशन आर्मीचा दावा आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानमधील हायप्रोफाईल ठिकाणांना लक्ष्य केल्यामुळे बीएलए यापूर्वी देखील चर्चेत आली आहे. या संघटनेनं मंगळवारी (11 मार्च) क्वेटाहून पेशावरला जाणारी जफर एक्स्प्रेस हायजॅक केली. या हल्ल्यात त्यांनी पाकिस्तानच्या लष्करातील 20 जणांना ठार केले. तसंच रेल्वेतील 100 पेक्षा जास्त प्रवाशांना ओलीस ठेवले. त्यामध्ये पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर संघटना आयएसआयमधील व्यक्तींचाही समावेश आहे.
कोण आहेत बलूच?
बलूच हा पाकिस्तानमधील एक समुह आहे. हा समुह पाकिस्तानमधील बलुचिस्तानसह इराण आणि अफगाणिस्तानमध्येही पसरला आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील दुर्गम, मोठा तसंच मागास प्रदेश आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीनं संपन्न असलेल्या या प्रदेशाची लोकसंख्या सर्वात कमी असून बहुसंख्य नागरिक गरीब आहेत.
( नक्की वाचा : Pakistan Train Hijack : पाकिस्तानमध्ये संपूर्ण रेल्वे हायजॅक, 100 पेक्षा जास्त प्रवासी ओलीस! )
या लोकांची एक विशिष्ट संस्कृती (बलोच) असून ती पंजाबी, पश्तू आणि सिंधी संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. भारताच्या फाळणीनंतर 1947 साली पाकिस्तानची निर्मिती झाली. यावेळी मोठ्या संघर्षानंतर या प्रदेशाचा पाकिस्तानमध्ये समावेश झाला.
बलोच लिबरेशन आर्मीचा इतिहास
बलोच लिबरेशन आर्मीची स्थापना 2000 साली झाली. ही आर्मी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहे. बलुचिस्तानमधील सर्वात मोठी सशस्त्र संघटना असल्याचा त्यांचा दावा आहे. पाकिस्तान सरकार या प्रदेशातील साधनसंपत्तीचं शोषण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. पाकिस्तान सरकारनं 2006 साली या संघटनेवर बंदी घातली आहे.
पाकिस्तान सरकारनं बंदी घातल्यानंतरही या संघटनेची लोकप्रियता कायम आहे. पाकिस्तान सैन तसंच नौसनेवर त्यांनी यापूर्वी देखील हल्ले केले आहेत. पाकिस्तानमधील ग्वादार बंदराला देखील त्यांनी लक्ष्य केलंय. बलुचिस्तान प्रांतामध्ये चीनकडून होत असलेल्या हस्तक्षेपाला देखील त्यांनी विरोध केला आहे.
( नक्की वाचा : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांना अमेरिकेत No Entry ! डोनाल्ड ट्रम्प का घेणार निर्णय? )
बलोच लिबरेशन आर्मीनं गेल्या काही वर्षात ज्या प्रमुख हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय त्यामध्ये
- कराचीतील चीनच्या दुतावासावर 2018 साली झालेला हल्ला
- ग्वादारमधील लग्झरी हॉटेलवर 2019 साली झालेला हल्ला
- रेल्वे लाईन आणि पॉवर ग्रीडच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेल्या विविध हल्ल्यांचा समावेश आहे.
- चीनच्या पुढाकारानं पाकिस्तानमध्ये होत असलेल्या CPEC प्रोजेक्टवर या संघटनेनं सातत्यानं हल्ले केले आहेत.
कोण करतं नेतृत्त्व?
अस्लम बलूच हा 2006 ते 2018 या काळात या संघटनेचा प्रमुख होता. 2018 साली अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात अस्लम मारला गेला. या घटनेमुळे बलोच लिबरेशन आर्मीचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर या संघटनेने त्यांच्या प्रमुख व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नाही. मीडिया रिपोर्टनुसार बलुचिस्तानमधील स्थानिक कमांडर्सचा गट या आर्मीचं नेतृत्त्व करतो.
पाकिस्तान सरकारकडून लष्करी वरंवटा फिरवल्यानंतर ही संघटना अद्याप सक्रीय आहे. त्याचबरोबर बलुचिस्तानमधील नागरिकांची सहानुभूती आणि पाठिंबा या संघटनेला असल्याचं वारंवार सिद्ध झालंय . या प्रश्नावर लष्करी कारवाई किंवा सरकारी दडपशाही न करता राजकीय चर्चा केली पाहिजे. त्यांच्या मुख्य प्रश्नावर कायमस्वरुपी उत्तर शोधण्यावर भर दिला पाहिजे, असं मत विश्लेषकांनी व्यक्त केलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world