Reason for Public anger against Sheikh Hasina : बांगलादेशमध्ये वेगानं घडत असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये हंगामी सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु झाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नोबेल पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस (Nobel Winner Dr Yunus) या सरकारचं नेतृत्त्व करु शकतात. मीडिया रिपोर्टनुसार विद्यार्थी आंदोलनाचा नेता नाहिद इस्लामनं यापूर्वी डॉ. युनूस यांच्याशी चर्चा केली आहे. बांगलादेशमध्ये घडलेल्या घडामोडींवर डॉ. मोहम्मद युनूस यांनी NDTV शी बातचित केली.
युनूस यांना झाली होती शिक्षा
ढाकामधील एका कोर्टानं या वर्षाच्या सुरुवातीला नोबेल पुरस्कार विजेत्या मोहम्मद युनूस यांना एका प्रकरणात 6 महिने शिक्षा सुनावली होती. कामगार कायदा तोडल्याच्या प्रकरणात ही शिक्षा झाली होती. त्यांना ही शिक्षा सुनावल्यानंतर जामीन मिळाला. तसंच या शिक्षेला आव्हान देण्यासाठी 30 दिवसांची मुदत मिळाली.
मोहम्मद युनूस हे ना नफा कंपनी ग्रामीण टेलिकॉमचे संचालक आहेत. या कंपनीचे बांगलादेशच्या टेलिकॉम सेक्टरमध्ये 34 टक्के वाटा आहे. या कंपनीनं 67 कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचं आश्वासन पाळलं नाही, असा त्यांच्यावर आरोप होता. कंपनीच्या धोरणानुसार डेव्हिडंटमधील 5 टक्के कर्मचाऱ्यांना मिळालायला हवे होते. ते मिळाले नाहीत. या आरोपांवर मोहम्मद युनूसह कंपनीच्या तीन अन्य संचालकांना शिक्षा सुनावण्यात आली होती.
( नक्की वाचा : पाकिस्तान, नेपाल, श्रीलंका, मालदीव आणि आता बांगलादेश... धूर्त चीन कसं रचतोय चक्रव्यूह? )
कोण आहेत डॉ. युनूस ?
डॉ. युनूस हे नोबेल पुरस्कार विजेते आहेत. त्यांनी गरिबांना बँकेच्या सोयी देण्याबाबत प्रयोग केले. गरिबांचं आयुष्य चांगलं करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी 2006 साली त्यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. युनूस यांचा हसीना सरकारशी बराच काळापासून वाद सुरु आहे. 2008 साली शेख हसीना सरकार सत्तेत आलं त्यावेळी त्यांच्या विरोधातील वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी सुरु करण्यात आली. 2011 साली सरकारी नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपात त्यांना वैधानिक ग्रामीण बँकेच्या प्रबंध संचालक पदावरुन दूर करण्यात आलं होतं.
( नक्की वाचा : बांगलादेशमध्ये सत्ताबदल करणारा विद्यार्थी नेता Nahid Islam कोण आहे? )
सध्या कुठं आहेत डॉ. युनूस?
डॉ. युनूस सध्या बांगलादेशच्या बाहेर आहेत. ते ऑलिम्पिक समितीच्या निमंत्रणानंतर प्रमुख पाहुणे म्हणून पॅरिसला गेले होते. सध्या ते त्यांच्यावरील उपचारासाठी परदेशात आहेत. ते लवकरच बांगलादेशमध्ये परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.