जगातील महासत्ता होण्याच्या दिशेनं भारताची वेगानं वाटचाल सुरु आहे. सैन्य शक्ती किंवा आर्थिक संपन्नता प्रत्येक क्षेत्रात भारत प्रगती करत आहे. अमेरिका आणि युरोपीयन देश यापूर्वी चीनमध्ये गुंतवणूक करत असत, पण कोरोनानंतर त्यांनी चीनमधील गुंतवणूक कमी केलीय. या देशांची आता गुंतवणुकीसाठी भारतासह अन्य देशांना पसंती आहे. त्याचा फटका चीनला बसतोय.
भारतामधील आंदोलनाला चीनची फूस असल्याची चर्चा वारंवार होत असते. भारतामध्ये अशांतता निर्माण व्हावी यासाठी चीन प्रयत्न करत आहे का? या प्रश्नाचं उत्तर भविष्यात मिळेल. पण, भारत सरकार चीनला चोख उत्तर देत असल्यानं त्यांचे भारतामधील प्रयत्न पूर्ण यशस्वी अद्याप झालेले नाहीत. त्यामुळे चीन भारताच्या भोवती चक्रव्यूह रचतोय. त्यामध्ये भारताचे सर्व शेजारी देश त्याचे गुलाम होतील. ते चीनच्या इशाऱ्यावर कारभार करतील. भारताचे सर्व शेजारी देश अस्थिर आणि अशांत राहावे यासाठी चीन खटाटोप करत आहे.
बांगलादेशसोबत काय होती अडचण?
बांगलादेशचं उदाहरण सर्वात ताजं आहे. बांगलादेशमध्ये स्वतंत्र निर्णय घेणारं सरकार होतं. त्या सरकारचे भारतासोबत उत्तम संबंध होते. चीन, अमेरिका आणि युरोपीयन देशांशी हे सरकार संबंध ठेवून होतं. बांगलादेशला चीनचं खेळणं करण्यास शेख हसीना तयार नव्हत्या. त्या त्यांच्या देशाच्या हिताचे निर्णय घेत होत्या.
( नक्की वाचा : दिल्लीतील कोठी नंबर 56 ची गोष्ट, जिथं मिसेस मजूमदार नावानं होतं शेख हसीनाचं वास्तव्य )
शेख हसीना यांनी 26 जून 2024 रोजी तीस्ता नदीवरील मोठा जलाशय तयार करण्याचं जाहीर केलं होतं. याबाबत सर्व प्रस्तावांचा विचार करुन देशाच्या विकासाला पूरक ठरेल तो प्रस्ताव स्वीकारणार असल्याचं हसीना यांनी जाहीर केलं होतं. हसीना यांचं स्वतंत्र वृत्तीनं कारभार करणं चीनला मान्य नव्हतं.
चीनला बांगलादेशमध्ये त्यांच्या मर्जीनं चालणारं सरकार हवं होतं. चीनच्या मित्रांना स्वत:चा मित्र आणि शूत्रांना शत्रू समजणारं सरकार बांगलादेशमध्ये स्थापन करण्याची चीनची योजना होती.
नेपाळमध्येही हेच केलं?
चीनला बांगलादेशात काय हवं आहे ? हे समजून घेण्यासाठी नेपाळमधील यापूर्वीचया ओली सरकारकडं पाहायला हवं. चीनच्या पाठिंब्यामुळेच केपी शर्मा ओली यांच्या मागील कारकिर्दीमध्ये भारत-नेपाळ संबंध कमालीचे बिघडले होते. भारत आणि नेपाळच्या नागरिकांमध्ये कटूता वाढत होती. आता ओली पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत. पण, यंदा त्यांच्याकडं पहिल्यासारखं बहुमत नाही. त्यानंतरही कोणत्याही परिस्थितीमध्ये ओली सत्तेवर राहावे यासाठी चीन प्रयत्न करत आहे. ओलीच्या माध्यमातून भारतावर नजर ठेवण्याची चीनची योजना आहे.
( नक्की वाचा : शेख हसीना यांच्या आयुष्यातील सर्वात खडतर 45 मिनिटं, वाचा सत्ता सोडण्यापूर्वी नेमकं काय झालं? )
श्रीलंका उद्धवस्त
श्रीलंकेतील गोटबाया राजपक्षे सरकारसोबत काय झालं हे सर्वांना आठवत असेल. गोटबाया राजपक्षेंच्या माध्यमातून चीननं श्रीलंकेतील जमिनीवर कब्जा केला. कर्जाच्या जाळ्यात श्रीलंकेला अडकवलं. त्यामुळे श्रीलंकेची अर्थव्यवस्था गुदमरली. त्याचा परिणाम राजपक्षेंना सहन करावा लागला.
श्रीलंकेचे नागरिकांना या उदाहरणामुळे धडा मिळाला. हे सर्व काही चीनमुळे झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. राजपक्षे सरकारनं भारताविरुद्ध अनेक निर्णय घेतले होते. नव्या सरकारनं हे संबंध सुरळीत करण्यासाचे प्रयत्न सुरु केले. श्रीलंका अडचणीत सापडल्यावर भारतानं सढळ हातांनी मदत केली होती. आज भारत आणि श्रीलंकेचे संबंध पुन्हा एकदा चांगले होऊ लागले आहेत.
( नक्की वाचा : बांगलादेशमध्ये सत्ताबदल करणारा विद्यार्थी नेता Nahid Islam कोण आहे? )
मालदीवला फटका
चीनची चालाखी समजून घेण्यासाठी मालदीव देखील मोठं उदाहरण आहे. मालदीव आणि भारताचे यापूर्वी चांगले संबंध होते. चीननं तिथं हस्तक्षेप केला. मोहम्मद मुइज्जू यांचं प्रोपगंडा सरकार बनवलं. या सरकारनं भारताविरुद्ध विष ओकण्यास सुरुवात केली. भारतानं काही काळ हे सहन केलं. पण, अखेरीस भारतीयांनी मालदीवर बहिष्कार घालण्यास सुरुवात केली. त्याचा फटका मालदीवच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. मालदीवचे सरकार चीनचं बाहुलं बनलं आहे. चीन मालदीवलाही कर्जाच्या जाळ्यात अडकवून तेथील जमिनीचा ताबा घेईल ही शक्यता आहे.
पाकिस्तान खेळणं
पाकिस्तान हा चीनचा पहिला प्रयोग होता. भारतापासून वेगळं झाल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांमध्ये नेहमीच भारताबद्दल द्वेष होता. चीननं त्यांना चिथावणी दिली. स्वत:च्या हितासाठी वापर केला. भारतानं स्वतंत्र नितीचा अवलंब करत विकासाचा मार्ग स्वीकारला. पण पाकिस्तान चीनवर अवलंबून राहू लागला.
( नक्की वाचा : भारताजवळ नवा देश तयार करण्याचा अमेरिकेचा प्लॅन? )
यापूर्वी अमेरिका पाकिस्तानला मदत आर्थिक मदत करत असे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांकडंही अमेरिकेनं कानाडोळाही केला आहे. पण, पाकिस्ताननं अमेरिकेपेक्षा चीनला प्राधान्य दिलं. त्यामुळे अमेरिकेनंही मदतीचा हात आखडता घेतला आहे. आता पाकिस्तान चीनच्या कर्जाच्या समुद्रात बुडाला आहे. या कर्जावरील व्याज देण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान IMF कडं कर्जाची भीक मागत आहेत. चीननं यापूर्वीच पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरचा एक भाग बळकावलाय. आता त्याची नजर पूर्ण काश्मीर आणि बलूचिस्तानवर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world