North Korea Escape Story: उत्तर कोरियाच्या क्रूर हुकूमशाहीतून सुटण्यासाठी एका कुटुंबाने तब्बल 10 वर्षे मोजली आणि केवळ 2 तासांच्या थरारक प्रवासात मृत्यूला चकवा देत स्वातंत्र्य मिळवले. एका मासेमारी करणाऱ्या छोट्या बोटीत बसून समुद्राच्या लाटांशी झुंज देत, मुरुमाच्या पोत्यात लहान मुलांना लपवून आणि चक्क सुरुंग शेतातून वाट काढत या कुटुंबाने दक्षिण कोरिया गाठले. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल असा हा सत्य थरार वाचून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
10 वर्षांची प्रतीक्षा आणि वडिलांची इच्छा
किम कुटुंबाच्या या पलायनाचा पाया 10 वर्षांपूर्वीच रचला गेला होता. या कुटुंबातील दोन भाऊ, किम इल-ह्योक आणि किम यी-ह्योक यांच्या वडिलांनी समुद्राच्या मार्गाने पळून जाण्याचा विचार मांडला होता. दुर्दैवाने, वडिलांचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांचे निधन झाले. मात्र, आपल्या वडिलांच्या अस्थी सोबत घेऊन या दोन्ही भावांनी अखेर 6 मे 2023 रोजी उत्तर कोरिया सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
पॅचवर्क आणि मासेमारीचा बनाव
हा प्रवास सोपा नव्हता. किम यी-ह्योक हा धाकटा भाऊ मुद्दाम उत्तर कोरियाच्या किनारपट्टीवर राहायला गेला. तिथे त्याने मासेमारीचे तंत्र आत्मसात केले आणि स्वतःची बोट खरेदी केली. उत्तर कोरियाच्या कडक सुरक्षा रक्षकांसोबत मैत्री करण्यासाठी त्याने त्यांना लाच दिली आणि त्यांचा विश्वास संपादन केला. मासेमारी करण्याचा बनाव करत त्याने अनेक वेळा सीमेजवळ जाऊन गस्त घालणाऱ्या बोटींच्या वेळांची आणि त्यांच्या रडारची माहिती गोळा केली.
( नक्की वाचा : 60 फूट खोल खड्डा आणि 50 तासांचा थरार! 20 वर्षांपूर्वी मृत्यूला हरवणारा Borewell Boy 'प्रिन्स' आता काय करतो? )
सुरुंग शेतातून प्रवास आणि पोत्यात लपलेली मुले
ज्या रात्री त्यांनी पळून जाण्याचे ठरवले, त्या रात्री समुद्रात वादळ होते. याच संधीचा फायदा त्यांनी घेतला. मात्र, बोटीपर्यंत पोहोचण्यापूर्वी कुटुंबातील महिलांना, ज्यात एका 5 महिन्यांच्या गरोदर महिलेचा समावेश होता, त्यांना चक्क सुरुंग पेरलेल्या शेतातून चालत जावे लागले. पकडले जाण्याच्या भीतीने त्यांनी आपल्या 4 आणि 6 वर्षांच्या लहान मुलांना मुरुमाच्या पोत्यात लपवले होते आणि त्यांना शांत राहण्याची सक्त ताकीद दिली होती.
रडारला चकवा देणारी संथ चाल
समुद्रात बोटीचा वेग वाढवला असता तर उत्तर कोरियाच्या रडारवर ती लगेच दिसली असती. त्यामुळे त्यांनी आपली बोट एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखी संथ गतीने चालवली. रडारवर ती फक्त कचरा दिसावा, असा त्यांचा प्रयत्न होता. अवघ्या 2 तासांच्या या प्रवासात सर्वांचे श्वास रोखले गेले होते. जेव्हा त्यांना दक्षिण कोरियाच्या येओनप्योंग बेटाचे दिवे दिसले, तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला. दक्षिण कोरियन नौदलाने त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांचा वनवास संपला.
( नक्की वाचा : Dhurandhar 2 मधील दाऊदचं आजारपण खरं की खोटं? वाचा अंडरवर्ल्डच्या पडद्यामागचं सत्य सांगणारा विशेष Review )
स्वातंत्र्याचा आनंद आणि दुर्दैवी शेवट
दक्षिण कोरियात पोहोचल्यानंतर 4 महिन्यांनी किम इल-ह्योकच्या पत्नीने एका मुलीला जन्म दिला. कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. ज्या भावामुळे हे कुटुंब सुरक्षित बाहेर पडले, त्या किम यी-ह्योकचा एका स्कूबा डायव्हिंग अपघातात मृत्यू झाला. स्वातंत्र्याचे अवघे 19 महिने अनुभवल्यानंतर त्याने जगाचा निरोप घेतला.
आज किम इल-ह्योक दक्षिण कोरियात शेफ म्हणून प्रशिक्षण घेत असून उत्तर कोरियातील नरकयातनांबद्दल जगाला माहिती देत आहेत. मार्च 2026 मध्ये त्यांच्या घरात दुसऱ्या मुलीचे आगमन झाले असून, "मी स्वतःला नशीबवान समजतो," असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world