Pakistan's prime minister Shehbaz Sharif : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या ताज्या वक्तव्यामुळे शरीफ यांच्यावर नाव बदलण्याची वेळ येऊ शकते. जाहीर भाषणाच्या दरम्यान आक्रमक वक्तव्य करण्याच्या नादात वाहवत जाण्याचा शरीफ यांचा इतिहास आहे. त्यांनी एका सभेत बोलताना भारताला पराभूत केलं नाही तर माझं नाव बदला, असं आव्हानच दिलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील डेरा गाझी खानमध्ये झालेल्या एका सभेत शरीफ चांगलेच जोशात होते. त्यांनी उत्साहाच्या भरात भाषण करताना स्टेजवरुन उडी मारली. पोडियमवर मूठ आदळले. तसंच हाताची मूठ उंचावत समर्थकांना उत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तान सरकार सर्वसामान्यांच्या हितासाठी दिवस रात्र काम करत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, असा दावा त्यांनी या भाषणात केला. या वक्तव्यानंतर लगेच ते आक्रमक झाले. 'आमच्या प्रयत्नांमुळे पाकिस्ताननं विकासाच्या मुद्यावर भारताला मागे टाकलं नाही, तर माझं नाव बलला. असं त्यांनी सांगितलं.
शहबाज यांनी या भाषणात त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही उल्लेख केला. ते यावेळी म्हणाले की, मी नवाज शरीफ यांचा फॅन आणि अनुयायी आहे. आज मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की माझ्यामध्ये शक्ती असेपर्यंत आपण सर्वजण मिळून पाकिस्तानला महानतेपर्यंत नेण्यासाठी आणि भारताला पराभूत करण्यासाठी काम करू असे शहबाज यावेळी म्हणाले.