
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून दोन सरकारी शिष्टमंडळे जगातील मोठ्या देशांमध्ये पाठवली जाणार आहेत. या शिष्टमंडळांवर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारतासोबतच्या सध्याच्या तणावावर पाकिस्तानचा दृष्टिकोन योग्य प्रकारे मांडण्याची जबाबदारी असेल. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी या संपूर्ण प्रकरणावर माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तीन माजी परराष्ट्र मंत्री, दोन माजी परराष्ट्र सचिव, अमेरिकेतील दोन माजी राजदूत आणि एक मंत्री यांचा समावेश असलेले एक उच्चस्तरीय पथक, रविवारी न्यूयॉर्कला दाखल झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानचे वृत्तपत्र 'द डॉन'ने परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्राने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे की, हे शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसी, लंडन आणि ब्रुसेल्सला देखील भेट देईल. पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी, हिना रब्बानी खार आणि खुर्रम दस्तगीर यांसारखे माजी परराष्ट्र मंत्री, सिनेटर शेरी रहमान, मुसादिक मलिक, फैसल सब्झवारी आणि बुशरा अंजुम बट तसेच जलील अब्बास जिलानी आणि तहमीना जंजुआ हे या शिष्टमंडळाचे सदस्य आहेत.
हा गट संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस, संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष आणि सुरक्षा परिषदेच्या सर्व पाच स्थायी सदस्यांच्या राजदूतांना भेटणार आहे. तसेच, हे ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (OIC) संघटनेच्या दूतांच्या संयुक्त सत्रालाही संबोधित करेल. ट्विटरवर एका पोस्टमध्ये, बिलावलने म्हटले आहे की ते त्यांच्यासोबत एक 'स्पष्ट संदेश' घेऊन पोहोचले आहेत. हे शिष्टमंडळ 3 जून रोजी आपला दौरा सुरू करेल. ज्यामध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, खासदार,आणि प्रमुख माध्यम संस्थांसोबत बैठका होतील. असं त्यांनी सांगितलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, पंतप्रधानचे विशेष सहाय्यक सय्यद तारिक फातमी यांच्या नेतृत्वाखालील आणखी एक शिष्टमंडळ 2 जून ते 4 जूनपर्यंत रशियाचा दौरा करेल. या दौऱ्यादरम्यान फातमी वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांशी भेटतील. माध्यमांशी तसेच काही बड्या अधिकाऱ्यां बरोबर ही संवाद साधतील. दुसरीकडे, सिनेटर शेरी रहमान यांनी ही या भेटीबाबत माहिती दिली आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर जगभरात सात शिष्टमंडळे भारताने पाठवली आहेत. त्यांच्या माध्यमातून पाकिस्तान दहशतवादाला कसे खतपाणी घालत आहे हे निदर्शनास आणून देत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world