अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प हे वादळी निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात होती. प्रत्यक्षात घडलेही तसेच. ट्रम्प यांनी सत्तेत विराजमान होताच एक सेकंदही न घालवता त्यांना वाटणारे आणि पटणारे निर्णय घेण्यास सुरुवात केली. शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात त्यांनी म्हटले की, अमेरिकेत आता सुवर्णय युग अवतरले आहे. ट्रम्प यांनी पारलिंगी (Transgender in USA) ही संकल्पनाच अमान्य असेल असे जाहीर केले आहे. 78 वर्षांच्या ट्रम्प यांनी पदभार स्वीकारताच 78 आदेशांवर सही केल्याचे सांगण्यात येत आहे. ट्रम्प यांच्या या आदेशांचा परिणाम संपूर्ण जगावर होणार आहे. ट्रम्प यांनी तुरुंगात कैद करण्यात आलेल्या 1500 दंगेखोरांची शिक्षा माफ करण्याचे आदेश दिलेत याशिवाय त्यांनी घरून काम करण्याची पद्धतही बंद करून टाकली आहे. त्यांनी घेतलेले 10 महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत ते पाहूयात.
नक्की वाचा : इन्फ्लुएन्सर बनला भिकारी! दिवसभराची कमाई पाहून सगळेच झाले चकीत
1. WHO तून अमेरिका बाहेर
जागतिक आरोग्य संघटना ही ट्रम्प यांच्या निशाण्यावर ते पूर्वी राष्ट्राध्यक्ष असतानापासून आहे. त्यांनी यापूर्वीही जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडायचा निर्णय घेतला होता, मात्र अमेरिकेत सत्ताबदल झाला आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं होतं. यावेळी मात्र ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारताच जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. चीनची लोकसंख्या अमेरिकेच्या तुलनेत जास्त असताना, ते जागतिक आरोग्य संघटनेला कमी रक्कम देत आहेत. अमेरिकेची लोकसंख्या, चीनच्या तुलनेत कमी असताना अमेरिका या संघटनेला जास्त रक्कम देत असल्याचा ट्रम्प यांना राग आला होता. जागतिक आरोग्य संघटनेने, अमेरिकेला रक्कम कमी करून सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता असेही ट्रम्प यांचे म्हणणे आहे. बायडेन यांना हे माहिती असूनही त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला नाही असा ट्रम्प यांनी आरोप केला आहे.
2. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्याही निर्णयाचा समावेश आहे. ट्रम्प यांनी सोमवारी एका आदेशावर सही केली, ज्यामध्ये सरकारी कार्यालयातील कोणत्याही व्यक्तीने अमेरिकेतली नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन करू नये असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतो, मात्र त्याचा आयुधासारखा वापर करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे यासंदर्भातील आदेश आम्ही पुन्हा लागू करत आहोत. अमेरिकेच्या सरकारी कार्यालयांद्वारे अमेरिकेच्या लोकांवर घालण्यात आलेली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंदी दूर करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेतली सरकारी यंत्रणा भ्रामक माहिती, अफवा पसरवणे अत्यादी गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिकेच्या नागरिकांना दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायमल्ली करत आहे. स्वतंत्र समाजामध्ये अशा पद्धतीची सेन्सॉरशिप ही सहन करता येणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
3. BRICS ला धमकी
भारताचा समावेश असलेल्या BRICS या संघटनेला डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे धमकी दिली आहे. जर ब्रिक्सने अमेरिकेच्या विरोधी धोरणे आणण्यास सुरुवात केली तर त्याचे परिणाम ब्रिक्सला भोगावे लागतील असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जर ब्रिक्सने अमेरिकेतविरोधी धोरणे आणली तर या संघटनेतील देशांसाठी ते चांगले असणार नाही असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
4. TikTok ला 75 दिवसांचे अभय
ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा भार स्वीकारताच चीनशी संबंध सुधारण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. यााचाच एक भाग म्हणून त्यांनी टीकटॉक या चीनच्या मालकीच्या शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्मला पुढील 75 दिवस अभय असेल असे जाहीर केले आहे. या 75 दिवसांत टीकटॉकवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही मात्र या कंपनीने कायदेशीर बाबींची पूर्तता करावी असे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत. टीकटॉकद्वारे गोपनीय माहिती चीन चोरत असून त्याचा राष्ट्राच्या हिताला धोका असल्याने भारतासह अनेक देशांनी टीकटॉकवर बंदी घालण्याचा यापूर्वी निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेही टीकटॉक बंदीचे आदेश दिले होते.
नक्की वाचा : कोण आहेत काश पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्यांच्यावर सोपवली FBI ची जबाबदारी
5.रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याचे प्रयत्न करणार
गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेले रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. हा वाद लवकरात लवकर निवळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले. मी राष्टाध्यक्ष असतो तर हे युद्ध सुरूच झाले नसते असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
6. ग्रीनलँडवर अधिकार सांगण्यास सुरुवात
अमेरिका ग्रीनलँड बळकावणार असल्याच्या चर्चा ट्रम्प निवडणूक जिंकताच सुरू झाल्या होत्या. ट्रम्प यांनी आपले इरादे अजिबात लपवले नसून त्यांनी आपली ग्रीनलँड बळकावण्याची इच्छा असल्याचे स्पष्टपणे सांगून टाकले आहे. ग्रीनलँडही फार छान जागा असून आम्हाला आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी ती हवी आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. आपल्या या निर्णयाशी डेनमार्कही सहमत असेल असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. ग्रीनलँडच्या देखभालीसाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत आहे आणि ग्रीनलँडची जनता डेनमार्कवर खूश नाहीये असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. इथे सर्वत्र चिनी आणि रशियाच्या युद्धनौका दिसतात आणि ग्रीनलँड हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा आहे असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
7. कॅनडा-मेक्सिकोवर 25 टक्के शुल्क
कॅनडा आणि मेक्सिको ट्रम्प यांना सातत्याने सलत आले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष होताच या दोन्हींवर 25 टक्के शुल्क आकरण्यास सुरुवात केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून केली जाणार आहे. या निर्णयामुळे कॅनडा किंवा मेक्सिकोतून येणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के अतिरिक्त कर लागेल. जर अमेरिकेने हा निर्णय घेतला असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी कॅनडा आणि मेक्सिकोही अशाच पद्धतीचे कर लावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
8. पारलिंगी संकल्पना बाद, फक्त पुरुष आणि स्त्री यांनाच मान्यता
ट्रम्प यांनी सत्तेवर येताच पारलिंगी ही संकल्पनाच बाद करून टाकली आहे. यापुढे अमेरिकेमध्ये स्त्री आणि पुरुष या दोनच लिंगांना मान्यता असेल, पारलिंगींना मिळणाऱ्या सोईसवलती, सुविधा आणि आरक्षणे यामुळे बंद होणार आहेत. अमेरिकेतली अनेक तरुण लिंगबदल करायला लागले आहेत, उद्योगपती आणि आता ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी असलेले इलॉन मस्क यांच्या मुलानेही लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती.
9. दंगेखोरांना माफी
2021 साली ट्रम्प राष्ट्राधअयक्षपदाची निवडणूक हरले होते. यानंतर ट्रम्प समर्थकांनी अमेरिकेच्या संसदेवर म्हणजेच कॅपिटल हिलवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये धरपकड करण्यात आलेल्या 1500 जणांना ट्रम्प यांनी माफी दिली आहे. यापुढे या लोकांवर कोणताही खटला चालणार नाही.
10. मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी जाहीर
अमेरिकेच्या सगळ्या सीमा सील करण्याच्या आणि सीमांवरील सुरक्षा अधिक वाढवण्याचा ट्रम्प यांनी आदेश दिला आहे. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर केलेल्या भाषणात मेक्सिकोच्या सीमेवर आणीबाणी घोषित केली आहे. मेक्सिकोतून असंख्यजण बेकायदेशीररित्या अमेरिकेमध्ये घुसत असतात. ही लोकं अमेरिकेत बस्तान मांडतात आणि इथे उपद्रव निर्माण करतात असा आरोप केला जातो, याला आळा घालण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ट्रम्प यांनी वारंवार सांगितले होते. ट्रम्प यांनी अमेरिकेत जन्म झालेल्या बाळाला अमेरिकेचे नागरिकत्व देण्याचे धोरण बंद करण्याच्या निर्णयावरही सही केली आहे.