जाहिरात

Video: जगाला घाबरवणारा हुकूमशहा चक्क हसतोय! फुटबॉलपटूंसोबत Kim Jong Un चा व्हिडिओ तुफान व्हायरल

Kim Jong Un smiling video: उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून कोणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

Video: जगाला घाबरवणारा हुकूमशहा चक्क हसतोय! फुटबॉलपटूंसोबत  Kim Jong Un चा व्हिडिओ  तुफान व्हायरल
Kim Jong Un smiling video: क्रूर हुकूमशहाची ही 'हॅपी इमेज' सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई:

Kim Jong Un smiling video: जगासाठी एक गूढ आणि क्रूर हुकूमशहा म्हणून ओळखले जाणारे उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांचा एक असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून कोणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. नेहमी गंभीर चेहऱ्याने क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेणारे किंवा लष्करी परेडमध्ये कडक शिस्तीत दिसणारे किम जोंग उन या व्हिडिओमध्ये चक्क हसताना, टाळ्या वाजवताना आणि खेळाडूंचे कौतुक करताना दिसत आहेत. क्रूर हुकूमशहाची ही 'हॅपी इमेज' सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, एका ऐतिहासिक विजयाने हे सर्व शक्य झाले आहे.

उत्तर कोरियाच्या लेकींनी रचला इतिहास

उत्तर कोरियातील 'नेगोयांग वुमेन्स एफसी' (Naegohyang Women's FC) या महिला फुटबॉल क्लबने आशियाई फुटबॉलमधील सर्वात मानाची मानली जाणारी 'एएफसी महिला चॅम्पियन्स लीग' जिंकून नवा इतिहास रचला आहे. आशियातील सर्वोत्तम क्लब ठरण्याचा मान मिळवणारा हा उत्तर कोरियाचा पहिलाच संघ ठरला आहे. 

दक्षिण कोरियातील सुवॉन शहरात खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात नेगोयांग संघाने जपानच्या 'टोक्यो वर्डी बेलेझा' या बलाढ्य संघाचा 1-0 असा पराभव केला. कॅप्टन किम क्यॉन्ग योंग हिने पूर्वार्धात केलेला गोल निर्णायक ठरला आणि उत्तर कोरियाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

( नक्की वाचा : 10 वर्षांचा प्लॅन अन् पोत्यात लपवलेली मुलं! उत्तर कोरियाच्या हुकूमशहाला असं गुंगारा देऊन पळालं 9 जणांचं कुटुंब )
 

मैदानावर विजयाचा जल्लोष आणि किम जोंग उन यांचे स्मितहास्य

विजयानंतर मायदेशी परतलेल्या या रणरागिणींचे स्वागत स्वतः किम जोंग उन यांनी केले. व्हायरल व्हिडिओमध्ये किम जोंग उन खेळाडूंना भेटताना त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसत आहे. ते खेळाडूंचे टाळ्या वाजवून अभिनंदन करत आहेत. हे पाहून खेळाडू मात्र कमालीचे भावूक झाले असून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसत आहेत. 

एरव्ही जगापासून अलिप्त राहिलेल्या या देशात फुटबॉल हा खेळाडूंच्या आणि राज्यकर्त्यांच्याही किती जिव्हाळ्याचा विषय आहे, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होते. संघाचे प्रशिक्षक री यू इल यांनी या यशाचे श्रेय किम जोंग उन यांच्या प्रेम आणि विश्वासाला दिले आहे.

दक्षिण कोरियाच्या भूमीवर फडकवला राष्ट्रध्वज

हा विजय केवळ खेळापुरता मर्यादित नव्हता, तर त्याला राजकीय किनारही होती. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील संबंध ताणलेले असतानाही, हा सामना दक्षिण कोरियात पार पडला. फायनलनंतर नेगोयांगच्या खेळाडूंनी मैदानावर उत्तर कोरियाचा राष्ट्रध्वज फडकवला. दक्षिण कोरियात उत्तर कोरियाचा ध्वज फडकवणे ही एक संवेदनशील बाब मानली जाते, तरीही तेथील सुमारे 1200 स्थानिक चाहत्यांनी या खेळाडूंचे टाळ्या वाजवून स्वागत केले. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांनीही सोशल मीडियाद्वारे उत्तर कोरियाच्या या महिला संघाचे अभिनंदन केले आहे.

आता जगाशी भिडण्याची तयारी

एएफसी चॅम्पियन्स लीग जिंकल्यामुळे आता हा संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या 'फिफा महिला चॅम्पियन्स कप'साठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेचे अंतिम सामने अमेरिकेतील मियामी येथे होणार आहेत. आशियात आपली ताकद दाखवल्यानंतर आता उत्तर कोरियाच्या या लेकी जगातील सर्वोत्तम सहा खंडांतील चॅम्पियन संघांशी भिडण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाकी पडलेल्या उत्तर कोरियासाठी महिला फुटबॉल हे जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्याचे एक मोठे साधन बनले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com