16 मार्च 2024 रोजी अमेरिकेतील एका रुग्णालयात 62 वर्षांच्या रिचर्ड स्लॅमेन यांच्यावर चार तासांची शस्त्रक्रिया करून डुकराची घातक जनुकं काढलेल्या किडनीचं प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. शस्त्रक्रियेच्या अवघ्या दोन महिन्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. डुकराची किडनी साधारण दोन वर्षांपर्यंत व्यवस्थित काम करू शकेल असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. मात्र अवघ्या दोन महिन्यात रिचर्ड स्लॅमेनच्या मृत्यूने मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे प्रत्यारोपणाच्या पाच आठवड्यांनंतर रिचर्ड यांची प्रकृती ठणठणीत होती. एप्रिल महिन्यात त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या एका 54 वर्षांच्या लिसा पिसानो यांना डुकराच्या किडनीचं प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. यांच्याही प्रकरणात डुकराची जनुकं काढण्यात आली आणि ही किडनी मानवी शरीरात लवकर जुळून यावी यासाठी काही मानवी जनुकं त्यात घालण्यात आली होती.
नक्की वाचा - बॉयफ्रेंडला करायची शेकडो कॉल-मेसेज, उत्तर न मिळाल्यास वागायची विचित्र! डॉक्टर म्हणाले-Love Brainची समस्या
2018 मध्येही किडनी ट्रान्सप्लांट
2018 मध्ये स्लॅमन यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र गेल्या वर्षी त्यात अडथळा आल्यानंतर ते डायलेसिसवर होते. ज्यानंतर डॉक्टरांनी त्याला डुकराची किडनी लावण्याचा सल्ला दिला होता. एका प्राण्याचा अवयव अशाप्रकारे दुसऱ्या प्राण्याला बसवण्याच्या प्रक्रियेला झिनोट्रान्सप्लान्टेशन असं म्हटलं जातं.
अमेरिकेत अवयवदान करणाऱ्यांपेक्षा अवयवांची गरज असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. एका रिपोर्टनुसार अमेरिकेत दरदिवशी अवयवांच्या प्रतीक्षेतच 17 रुग्णांचा मृत्यू होतो. इथं किडनीची गरज सर्वाधिक आहे, मात्र त्या तुलनेत किडनी दान करणाऱ्यांचं प्रमाण अत्यल्प. ऑर्गन पर्चेस आणि ट्रान्सप्लान नेटवर्कच्या माहितीनुसार, 2023 मध्ये तब्बल 27 हजार किडनी ट्रान्सप्लांट झालं असलं तरी तब्बल 89 हजार रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत होते. डुकराच्या अवयवाचं प्रत्यारोपण यशस्वी झालं तर प्रतीक्षा यादीतील रुग्णांसाठी ही क्रांती आशेचा नवा किरण ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना आता रिचर्ड यांच्या मृत्यूमुळे वैद्यकीय व्यवस्थेसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.