सौदी अरेबियाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रकार घडला आहे. सौदी अरेबियातील वाळवंटातील काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टी पाहायला मिळाली. त्यामुळे पहिल्यांदाच वाळवंटातील वाळूवर बर्फाचा थर पाहायला मिळाला आहे. सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागातील अल ज्वाफमध्ये हा प्रकार घडला.
सौदी अरेबियाच्या वाळवंटी प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी झालीय आणि असं हे पहिल्यांदाच घडलंय. म्हणजे ज्या पर्वतीय वाळवंटी भागात आतापर्यंत एकदाही बर्फवृष्टी किंवा गारपीठ झाल्याची नोंद नाही. तिथं आता बर्फाची चादर पसरलीय. सौदीच्या उत्तरेकडील अल ज्वाफ भागात ही घटना घडलीय. गेल्या काही दिवसांपासून सौदीच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीठ होतेय. पण थेट बर्फवृष्टी होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं.
त्यामुळेच हवामान तज्ज्ञही आश्चर्य व्यक्त करतायत. सोबत हवामान बदलाचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आलाय. बर्फाची चादर पसरल्यामुळे ऋतुनं कात टाकल्याचं मानलं जातंय. पुढच्या काही काळात आणखी बर्फवृष्टी तसच पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सौदी अरेबियाच्या हवामान विभागाने अल ज्वाफ भागात अलर्ट जारी केला आहे. येत्या दिवसात या परिसरात ढगांच्या गडगडाटासह वादळी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. केवळ सौदी अरेबियातील नागरिकांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागतो असं नाही. युएईलाही हवामान बदलाचा फटका सहन करावा लागत आहे.