Hajj 2025 Rule :सौदी अरेबियानं हज यात्रेकरुंच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. हे बदल याच वर्षापासून लागू होत आहेत. त्यामुळे हज यात्रेला जाणारे यात्रेकरु त्यांच्या मुलांना घेऊन जाऊ शकणार नाहीत. त्याचबरोबर पहिल्यांदा यात्रा करणाऱ्यांना यापूर्वी हज यात्रा करणाऱ्या यात्रेकरुंच्या तुलनेत काही प्राधान्य देण्यात आले आहे. गर्दी कमी करणे हा नव्या नियमांचा हेतू आहे, असं सांगितलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहेत नियम?
सौदी सरकारनं हज यात्रेसाठी यंदा काही बदल केले आहेत. या नियमानुसार हज यात्रेमध्ये विवाहित दाम्पत्यानं एकाच खोली राहण्यास मनाई करण्यात आली आहे. नवा नियम हज 2025 पासून लागू होईल. पुरुष आणि महिला यात्रेकरुंना वेगवेगळ्या खोलीत राहावं लागेल. पुरुष यात्रेकरुंना महिलांच्या खोलीत प्रवेश करण्याची संधी नसेल. 'द वोकल न्यूज' नं दिलेल्या वृत्तानुसार नवरा-बायकोंना एका खोलीत राहाता येत नसलं तरी त्यांच्या रुम्स या जवळ-जवळ असतील. महिला यात्रेकरुंची सुरक्षा तसंच प्रायव्हसीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
( नक्की वाचा : 6 कुतुबमिनारपेक्षाही उंच... सौदी अरेबिया असं काय बनवतंय ज्यावर संतापले आहेत जगभरातील मुस्लीम? )
हज 2025 साठी नियम
- यात्रेकरुंसोबत मुलांना हज यात्रेला जाता येणार नाही
- पहिल्यांदा हज यात्रा करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल
- हज यात्रेदरम्यानची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
- शिबीर, रस्ते आणि वाहन व्यवस्था अधिक आरामादायी आणि सोपी केली जाईल.
- यात्रेकरुंच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी याबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी होईल.
- 70 वर्षांच्या ऐवजी 65 वर्षांचे यात्रेकरु हजला जातील.
कधी होणार हज यात्रा ?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हज यात्री भारतामधून 29 एप्रिल ते 30 मे 2025 पर्यंत सौदीमध्ये जातील. हजचे मुख्य अनुष्ठान 3 जून ते 8 जून दरम्यान आहे. हा यात्रेमधील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. त्यासाठी लाखो मुसलमान मक्कामध्ये एकत्र येतात. आत्तापर्यंत 70 पेक्षा जास्त वयाच्या यात्रेकरुंना त्यांच्यासोबत एकाला नेण्याची परवानगी होती. आता ही वयोमर्यादा 65 पर्यंत कमी करण्यात आली आहे.
सौदी अरेबिया सरकारनं दिलेल्या माहितीनुसार नव्या कायद्यांमुळे हज यात्रा करणे सोपे होईल. या नियमांमुळे गर्दी कमी होईल. त्याचबरोबर गर्दीचं नियंत्रण करणे देखील सोपे जाईल. सौदी अरेबियानं व्हिसा नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.
नव्या व्हिसा नियमांचा 14 देशांवर जास्त परिणाम होईल
अल्जेरिया
बांगलादेश
इजिप्त
इथियोपिया
भारत
इंडोनेशिया
इराक
जॉर्डन
मोरक्को
नायजेरिया
पाकिस्तान
सुदान
ट्यूनिशिया
यमन
आता या देशातील नागरिकांना सौदी सरकार व्हिसावर एकदाच प्रवेश देईल. यापूर्वी त्यांना निश्चित कालावधीसाठी कितीबी वेळा सौदी अरेबियामध्ये ये-जा करता येत होते. पण, त्याचा दुरुपयोग होत होता. मल्टीपल एन्ट्री व्हिसा असलेले नागरिक हज यात्रेच्या दरम्यान सौदी अरेबियात जात होते. ते रजिस्ट्रेशन न करताच हज यात्रा करत. त्यामुळे गर्दी वाढत असे. पाकिस्तानी नागरिक हज यात्रेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात भीक मागण्यासाठी सौदी अरेबियामध्ये जात, असा आरोप करण्यात येत होता. पण, आता या सर्व प्रकारावर पायबंद बसणार आहे.