
Sikh Woman Assaulted in UK : ब्रिटनमधील ऑल्डबरी शहरात एका शीख महिलेवर झालेल्या क्रूर हल्ल्याने खळबळ उडाली आहे. येथील दोन अज्ञात व्यक्तींनी या 20 वर्षीय महिलेवर बलात्कार केला असून, तिला वर्णद्वेषी शिवीगाळ करत "परत तुझ्या देशात जा" असे म्हटले. या घटनेने ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय आहे प्रकरण?
गेल्या मंगळवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता ऑल्डबरी येथील टेम रोडजवळ ही धक्कादायक घटना घडली. हल्लेखोरांनी महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यासोबतच वर्णद्वेषी टिप्पणी केली. पोलिसांनी या प्रकरणाला 'वंशविद्वेषामुळे वाढलेला गुन्हा' म्हणून नोंदवले आहे आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी तिला "तुम्ही इथे राहण्यायोग्य नाही" असे म्हटले.
पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही आणि फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. बर्मिंगहॅमलाईव्ह या स्थानिक वृत्तसंस्थेने संशयितांची ओळख "व्हाईट मॅन" अशी केली आहे. एका संशयिताच्या डोक्याचं मुंडण केलेले होते आणि त्याने गडद रंगाचे स्वेटशर्ट घातले होते, तर दुसऱ्याने राखाडी रंगाचा टॉप परिधान केला होता.
( नक्की वाचा : Video : रस्त्यावर घरंगळत गेले शीर, आरोपीने उचलून फेकले कचरापेटीत; भारतीय मॅनेजरच्या हत्येने अमेरिका हादरली )
या घटनेमुळे स्थानिक शीख समुदायात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी या घटनेकडे एक सुनियोजित हल्ला म्हणून पाहिले आहे. पोलिसांनी लोकांच्या भावनांचा आदर करत या भागात गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.
या हल्ल्याचा अनेक ब्रिटिश खासदारांनी निषेध केला आहे. खासदार प्रीत कौर गिल यांनी अलीकडच्या काळात वाढलेल्या वर्णद्वेषाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, "आपल्या शीख समुदायाला आणि प्रत्येक समाजाला सुरक्षित, सन्मानित आणि मौल्यवान वाटण्याचा अधिकार आहे." , ऑल्डबरी किंवा ब्रिटनमध्ये कुठेही वर्णद्वेष आणि स्त्रीद्वेष यांना स्थान नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
खासदार जस अथवाल यांनीही या घटनेला "घृणित, वर्णद्वेषी आणि स्त्रीद्वेषी" हल्ला म्हटले आहे. ते म्हणाले की, हा हल्ला देशातील वाढत्या जातीय तणावाचा परिणाम आहे.
या घटनेच्या एक महिन्यापूर्वीच वूलवरहॅम्प्टनमध्ये एका रेल्वे स्टेशनबाहेर तीन तरुणांनी दोन वृद्ध शीख पुरुषांवर हल्ला केला होता. या घटना यूकेमध्ये वांशिक द्वेष आणि हिंसाचार वाढत असल्याचे हे चिन्ह आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world