Stephen Hawking Jeffrey Epstein Island : जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे आणि यावेळेस कारण त्यांचे संशोधन नसून खळबळजनक जेफ्री एपस्टीन फाइल्समधील काही फोटो आहेत. लैंगिक गुन्ह्यांच्या आरोपांनी घेरलेल्या एपस्टीनच्या खासगी बेटावरील हॉकिंग यांचे काही फोटो समोर आल्याने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
या फोटोंमध्ये हॉकिंग चक्क बिकिनी परिधान केलेल्या दोन महिलांच्या सोबतीने ड्रिंक्सचा आनंद घेताना दिसत आहेत, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काय आहे प्रकरण?
हे संपूर्ण प्रकरण अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केलेल्या जेफ्री एपस्टीन फाइल्सशी संबंधित आहे. समोर आलेल्या फोटोंमध्ये स्टीफन हॉकिंग एका सन लाउंजरवर बसलेले असून त्यांच्या हातात कॉकटेलचा ग्लास आहे. त्यांच्या दोन्ही बाजूंना बिकिनीमधील दोन महिला उभ्या आहेत.
हा फोटो 2006 मधील असल्याचे सांगितले जात असून, त्यावेळी हॉकिंग सेंट थॉमस येथील रिट्झ कार्लटन हॉटेलमध्ये एका विज्ञान परिषदेसाठी गेले होते. या परिषदेत त्यांनी क्वांटम कॉस्मॉलॉजीवर भाषण दिले होते आणि याच दरम्यान त्यांनी एपस्टीनच्या लिटिल सेंट जेम्स या खासगी बेटाला भेट दिली होती.
( नक्की वाचा : Bill Gates : लग्न मेलिंडाशी अन् प्रेम रशियन महिलांशी; बिल गेट्स यांच्या कबुलीने जगभरात खळबळ, एपस्टीनचंही नाव.. )
कुटुंबाचा दावा आणि बाजू
हॉकिंग यांच्या कुटुंबाने या फोटोंवर स्पष्टीकरण देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या प्रवक्त्याने डेली मेलला दिलेल्या माहितीनुसार, हॉकिंग यांच्यासोबत दिसणाऱ्या त्या दोन महिला कोणत्याही अनोळखी व्यक्ती नसून त्यांच्या दीर्घकाळ सोबत असणाऱ्या केअरटेकर म्हणजेच काळजीवाहू महिला आहेत.
हॉकिंग यांना मोटार न्यूरॉन या आजारामुळे 24 तास वैद्यकीय मदतीची गरज असायची आणि या महिला युकेमधून त्यांच्यासोबत गेल्या होत्या. हॉकिंग यांच्यावर लावण्यात आलेले कोणतेही गैरवर्तनाचे आरोप पूर्णपणे चुकीचे आणि तथ्यहीन असल्याचे त्यांच्या कुटुंबाने स्पष्ट केले आहे.
( नक्की वाचा : Bhigwan kidnapping case: प्रेमाचा दावा फोल? पाचच दिवसांत तरुणीनं बदलला निर्णय; भिगवण प्रकरणाला अनपेक्षित वळण )
एपस्टीन फाइल्समधील धक्कादायक उल्लेख
या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे व्हर्जिनिया जुफ्रे नावाच्या महिलेने केलेले आरोप. जुफ्रे हिने असा दावा केला होता की हॉकिंग यांनी व्हर्जिन आयलंडवर एका अल्पवयीन मुला-मुलींच्या पार्टीत सहभाग घेतला होता. या आरोपांनंतर जेफ्री एपस्टीनने 2015 मध्ये आपली सहकारी घिसलेन मॅक्सवेलला एक ईमेल लिहिला होता.
या ईमेलमध्ये त्याने म्हटले होते की, व्हर्जिनियाचे आरोप खोटे ठरवणाऱ्याला रोख बक्षीस देण्यात येईल. विशेषतः हॉकिंग यांच्यावर लावलेले आरोप चुकीचे सिद्ध करण्यासाठी त्याने मदत मागितली होती. एपस्टीन फाइल्समध्ये हॉकिंग यांच्या नावाचा उल्लेख किमान 250 वेळा आला आहे.
काय होती ती परिषद?
स्टीफन हॉकिंग यांनी मार्च 2006 मध्ये ज्या परिषदेला हजेरी लावली होती, त्याचे आयोजन आणि अर्थसाह्य स्वतः जेफ्री एपस्टीनने केले होते. ही परिषद कॅरिबियन बेटावर झाली होती. याच दौऱ्यात हॉकिंग यांनी एपस्टीनच्या बेटाची सहल केली होती आणि एका खास डिझाइन केलेल्या पाणबुडीतून समुद्राच्या तळाचा आनंदही घेतला होता. हॉकिंग यांचे या बेटावरील जेवतानाचे आणि फिरतानाचे फोटो आधीही समोर आले होते, मात्र या नव्या फोटोंनी आता सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.