Trump Greenland Offer: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या एका वेगळ्याच विषयामुळे जगभरात चर्चेत आले आहेत. ट्रम्प यांना बर्फाच्या चादरीखाली वसलेला ग्रीनलँड हा द्वीप समूह कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेचा भाग बनवायचा आहे. यासाठी ट्रम्प प्रशासनाकडून केवळ लष्करी ताकदच नाही, तर आता चक्क पैशांचे आमिष दाखवण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. ग्रीनलँडमधील प्रत्येक नागरिकाला करोडो रुपये देऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा मोठा प्लॅन अमेरिकेत शिजत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
काय आहे ऑफर?
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अधिकारी ग्रीनलँडमधील नागरिकांसाठी एका खास आर्थिक पॅकेजवर विचार करत आहेत. या योजनेनुसार, ग्रीनलँड डेन्मार्कपासून वेगळे होऊन अमेरिकेत सामील झाले, तर तिथल्या प्रत्येक रहिवाशाला एकरकमी मोठी रक्कम दिली जाऊ शकते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रक्कम प्रति व्यक्ती 10,000 डॉलर ते 1,00,000 डॉलर इतकी असू शकते. भारतीय चलनात विचार केला तर ही रक्कम साधारणपणे 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपयांच्या घरात जाते. मात्र, ही रक्कम नक्की किती असेल आणि ती कशी दिली जाईल, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.
( नक्की वाचा : US Strikes Venezuela अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला का केला? राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना का पकडलं? 5 मोठी कारणं )
ग्रीनलँडचे महत्त्व आणि ट्रम्प यांची जिद्द
ग्रीनलँड हा असा प्रदेश आहे जिथे मे ते जुलै या काळात 24 तास सूर्यप्रकाश असतो आणि उर्वरित काळ प्रचंड बर्फ असतो. येथील जीवन अत्यंत कठीण असूनही ट्रम्प या भूभागासाठी आग्रही आहेत. ग्रीनलँडमध्ये सध्या 57,000 लोक राहतात.
ट्रम्प प्रशासनाचा असा विचार आहे की, जर या सर्व नागरिकांना आर्थिक लाभ दिला, तर ते अमेरिकेत सामील होण्यास तयार होऊ शकतात. ग्रीनलँडवर सध्या डेन्मार्कचे नियंत्रण आहे आणि तेथील संरक्षण तसेच परराष्ट्र धोरण डेन्मार्कच सांभाळते.
( नक्की वाचा : ट्रम्प मोदींचे अपहरण करतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा धक्कादायक प्रश्न, खर्गेंचाही PM ना टोला )
डेन्मार्क आणि ग्रीनलँडचा विक्रीला स्पष्ट नकार
ट्रम्प यांच्या या महत्त्वाकांक्षेला डेन्मार्क आणि ग्रीनलँड या दोन्ही सरकारांनी जोरदार विरोध केला आहे. ग्रीनलँड हे विक्रीसाठी उपलब्ध नाही, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे. ग्रीनलँडमध्ये 1979 पासून स्वशासन लागू आहे, तरीही ते डेन्मार्कचा एक भाग मानले जातात.
ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः नाटोमधील मित्र देश असूनही ट्रम्प अशा प्रकारे ग्रीनलँडवर हक्क सांगत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
युरोपीय देशांकडून ट्रम्प यांच्यावर टीका
ट्रम्प यांच्या या प्रस्तावावर केवळ डेन्मार्कच नाही, तर संपूर्ण युरोपमधून टीकेची झोड उठली आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, ब्रिटन आणि पोलंड या देशांनी एकत्र येत एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, ग्रीनलँड आणि डेन्मार्क यांच्यातील संबंधांचा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त त्यांनाच आहे. कोणाचेही लष्करी किंवा आर्थिक दडपण या प्रक्रियेत मान्य केले जाणार नाही. मात्र, ट्रम्प आपली भूमिका सोडायला तयार नसल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसत आहे.