हेमाली मोहिते, प्रतिनिधी
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 भारतीयांचा मृत्यू झाला. या हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचं आता उघड झालंय. भारत या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या हल्ल्याचा बदला घेण्याचे सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. याबाबत भारतामध्ये उच्च स्तरीय बैठकांचा धडाका सुरु आहे. त्याचबरोबर पाकिस्तानला सर्व मार्गानं कोंडित टाकण्यासाठी भारतानं जाळं विणलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आर्थिक दृष्ट्या कंगाल असलेल्या पाकिस्तानची अडचण भारताच्या आक्रमक पावित्र्यामुळे वाढली आहे. भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी युद्ध पुकारलं तर कसं लढायचं असा प्रश्न दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानला पडलाय. पाकिस्तानच्या या बिकट अवस्थेचा युरोपातील तुर्किये या देशाला पुळका आला आहे.
( नक्की वाचा : भारताच्या लष्करी कारवाईची पाकिस्तानला भीती, 2 महिन्यांचे रेशन गोळा करण्यासाठी पळापळ )
पाकिस्तानचा पुळका, भारताचा विसर
तुर्कियेला मात्र पाकिस्तानचा इतका पुळका आलाय की त्यांनी पाकिस्तानला आता युद्धनौका देऊ केली आहे. पाकिस्तानच्या कराची बंदरात ही नौका दाखलही झालीय.यापूर्वी पहलगाम हल्ल्यानतंर तातडीन तुर्कियेनं पाकिस्तानाला पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हाही पाकिस्तानच्या दिमतीसाठी काही शस्त्र आणि विमानं पाठवली होती. आता युद्धनौका पाठवली मात्र हे करताना तुर्कियेला भारताच्या दानशूरतेचा विसर पडलाय.दोन वर्षांपूर्वी तुर्कियेमध्ये आलेल्या भीषण भूकंपावेळी भारतानं तुर्कियेला सढळ हस्ते मदत केली होती. मात्र तुर्किये ही मदत सोयीस्कररित्या विसरलाय असंच म्हणावं लागेल.
पाकिस्तानची संयुक्त राष्ट्रात धाव
मात्र तुर्किये आणि चीन आणि काही छोटी इस्लामी राष्ट्र सोडली तर पाकिस्तानला म्हणावा तितका आंतरराष्ट्रीय पाठिंबा नाही, हे पाकिस्तान देखील जाणतोच. त्यामुळे पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेत मदतीची याचना केलीय. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीची मागणी केली आहे. संयुक्त राष्ट्रात बंददाराआड चर्चा व्हावी अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्रानं सध्या तरी दोन्ही देशाला संयम बाळगण्याचं आवाहन केलंय. पण, त्यातील बहुतांश सदस्य भारताचे चांगलेच मित्र आहेत.
सुरक्षा परिषदेत चीन, रशिया, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स हे स्थायी सदस्य आहेत तर गैर स्थायी सदस्यांमध्ये अल्जेरिया, डेन्मार्क, ग्रीस, गयाना, पाकिस्तान, पनामा, दक्षिण कोरिया, सिएरा लियोन, स्लोवेनिय आणि सोमालिया या देशांचा समावेश आहे. यातील चीन सोडला तर बाकी सर्व देश भारतासोबत आहेत. पण, त्याचबरोबर पाकिस्ताननं कितीही गळा काढला तरी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय प्रतिमा यात जमीन आस्मानाचा फरक आहे. आणि याची जाणीव पाकिस्ताननं ठेवलेली बरी.
त्याचबरोबर भारतीयांकडून खाण्यासाठी मदत घेतल्यानंतर युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कियेचे दातही या निमित्तानं भारतासह संपूर्ण जगाला दिसले आहेत.