Russia Fine on Google : कोर्टानं सुनावलेल्या निकालात आरोपीला आर्थिक दंडाची शिक्षा मिळाल्याचं तुम्ही आजवर वाचलं असेल. पण, संपूर्ण जगात मिळून जितका पैसा नाही तितका दंड एखाद्या कोर्टानं कुणाला सुनावल्याचं तुम्ही आजवर कधीही वाचलं नसेल. पण, हे प्रत्यक्षात घडलं आहे. रशियातील एका कोर्टानं टेक्नॉलजी क्षेत्रातील बलाढ्य अमेरिकन कंपनी असलेल्या गूगलला $20 decillion इतका दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे. $20 decillion म्हणजे 2 वर एक, दोन किंवा तीन नाही तर तब्बल 34 शून्य.
संपूर्ण जगाचा जीडीपी एकत्र केला तरी त्याची किंमत 100 ट्रिलीयन डॉलर आहे. रशियन कोर्टानं सुनावलेली रक्कम ही त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. संपूर्ण जगाचा पैसा एकत्र केला तरी दंडाची रक्कम जास्त होणार आहे. संपूर्ण जगात जितका पैसा नाही तितका दंड या कोर्टानं गूगल कंपनीला सुनावला आहे. हा इतका पैसा आहे की तो मोजताना Google देखील थकून जाईल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रकरण काय?
हे संपूर्ण प्रकरण चार वर्षांपूर्वी सुरु झालं. त्यावेळी Google कंपनीचा भाग असलेल्या YouTube नं क्रेमलिनला पाठिंबा देणाऱ्या तसंच रशियन सरकार नियंत्रित करणाऱ्या मीडिया चॅनलचं अकाऊंट बंद केलं. त्सारग्राद टीव्ही, आयआरईए फॅन या सारखे अकाऊंट यूट्यूबनं काढून टाकले. या खात्यानं कायदेशीर तसंच व्यापारी नियमांचं उल्लंघन केल्याचा दावा गूगलनं केला होता.
मॉस्कोतील कोर्टानं या विषयावरील झालेल्या सुनावणीत गूगलचा हा दावा फेटाळण्यात आला. कोर्टानं गूगलला त्या चॅनलचं अकाऊंट पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर या आदेशाचं पालन केलं नाही तर दररोज 1000,00 रुबल दंडाची शिक्षा सुनावली. या शिक्षेचं चक्रवाढ व्याज दर आठवड्यात वाढत आहे.
( नक्की वाचा : 6 कुतुबमिनारपेक्षाही उंच... सौदी अरेबिया असं काय बनवतंय ज्यावर संतापले आहेत जगभरातील मुस्लीम? )
रशिया आणि युक्रेन यांच्यात 2022 साली युद्ध सुरु झालं. त्यानंतर ही परिस्थिती आणखी गंभीर झाली. YouTube नं रशियातील सरकारी मीडिया ( NTV, रशिया 24, RT आणि स्पुतनिक) यांचे अकाऊंट बंद केले. रशियातील 17 टीव्ही चॅनेल्सनी Google विरुद्ध खटले दाखल केले. त्यामुळे दंडाची रक्कम दररोज वाढू लागली.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धानंतर Google नं रशियातील कारभार बऱ्याच प्रमाणात कमी केला आहे. YouTube आणि Google Search हे प्लॅटफॉर्म रशियामध्ये उपलब्ध आहेत. युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियातून अनेक अमेरिकन कंपनीनी आपला गाशा गुंडाळालाय. पण, गूगलचं काम मर्यादीत स्वरुपात सुरु आहे. रशियन सरकारनं त्यांचे बँक खाते जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर झालेल्या संघर्षानंतर गूगलच्या रशियातील सहकारी कंपन्यांनी स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दिला आहे.
( नक्की वाचा : हेकट चीननं का केलं पंतप्रधान मोदींशी हस्तांदोलन? समजून घ्या कारण )
रशियन सरकारनं या दंडाचं प्रतिकात्मक उपाय असं वर्णन केलं आहे. त्याचा उद्देश गूगलला रशियातील ब्रॉडकास्टर्सबद्दलच्या धोरणांबाबत फेरविचार करण्यास भाग पाडणे हा आहे. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव यांनी रशियन मीडियाशी या विषयावर बोलताना सांगितलं की, रशियन मीडियावर YouTube नं घातलेले निर्बंध किती गंभीर आहेत, या विषयावर जगाचं लक्ष वेधणं हा या भक्कम दंडाचा हेतू आहे. 'मी या आकड्याचा व्यवस्थित उच्चारही करु शकत नाही,' असंही पेसकोव यांनी यावेळी सांगितलं.