"टॉयलेटला जाऊ नका, हात धुवू नका, शॉवर वापरू नका", या शहरात प्रशासनाचा आदेश, नागरिक चिंतेत

अमेरिकेतील मिशिगन राज्यातील ग्लॅडविन शहरात एका भीषण वादळात वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर थेट वीज कोसळल्यामुळे संपूर्ण शहरावर मोठे संकट ओढवले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमेरिकेतील मिशिगन राज्यातील ग्लॅडविन शहरात एक अत्यंत विचित्र आणि गंभीर घटना घडली आहे. सोमवारी (27 जुलै) वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात कडकडणारी वीज थेट शहराच्या वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर पडली. या दुर्घटनेमुळे पाणी शुद्धीकरण यंत्रणा आणि सीवेज सिस्टीम पूर्णपणे ठप्प झाली आहे.

'टॉयलेट, सिंक आणि शॉवर वापरू नका!' 

वीज पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच शहरवासीयांच्या मोबाईलवर प्रशासनाकडून एक अत्यंत महत्त्वाचा आपत्कालीन मेसेज आला. यामध्ये नागरिकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या की, "पुढील अधिकृत आदेश येईपर्यंत शहरातील कोणत्याही नागरिकाने घरातील टॉयलेट, सिंक आणि शॉवरचा वापर अजिबात करू नये."

Advertisement

(नक्की वाचा-  लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)

एका फ्लशमुळे संपूर्ण घर होणार दूषित

'द डिट्रॉईट न्यूज'ने दिलेल्या वृत्तानुसार, वॉटर ट्रीटमेंट प्लांट अचानक बंद पडल्यामुळे शहराच्या मुख्य सीवेज पाईपलाईनवर प्रचंड दाब निर्माण झाला आहे. अशा स्थितीत नागरिकांनी घरात पाणी वापरले किंवा टॉयलेट फ्लश केले, तर गलिच्छ सीवरचे पाणी थेट उलट्या दिशेने वाहून लोकांच्या किचन, बाथरूम आणि नळांमधून घरात बाहेर येईल.

म्हणजेच, नागरिकांच्या एका चुकीमुळे संपूर्ण घरात दुर्गंधी आणि कचऱ्याचे साम्राज्य पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. सध्या इमर्जन्सी टीम आणि तांत्रिक कर्मचारी प्लांट दुरुस्त करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.

(नक्की वाचा-  VIDEO: 'रामायणम्' सिनेमाचा दमदार ट्रेलर लॉन्च; प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील रणबीरपेक्षा रावणाचीच चर्चा)

शहरातील पार्क्समध्ये 'पोर्टेबल टॉयलेट्स'ची व्यवस्था

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि उघड्यावर शौचास जाण्याची वेळ येऊ नये म्हणून स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या आहेत. शहरातील सार्वजनिक उद्याने, सिटी हॉल परिसर आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर पोर्टेबल टॉयलेट्स ठेवण्यात आले आहेत.

या विचित्र संकटामुळे शहरातील नागरिक हैराण झाले असून, सोशल मीडियावरही याची मोठी चर्चा रंगली आहे. "प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करा, अन्यथा प्रत्येकाच्या घरात सीवरचे पाणी शिरेल," असे आवाहन नागरिक एकमेकांना करत आहेत.
 


Topics mentioned in this article