Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 ऑगस्ट रोजी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. त्याचबरोबर आणखी 25 टक्के टॅरिफ लावणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. हे अतिरिक्त शुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारत आणि अमेरिका व्यापारी संबंध सध्या ताणले गेले आहेत. पण, आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक नवी घोषणा केली आहे. त्यामुळे भारताला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले ट्रम्प?
ट्रम्प यांनी शुक्रवारी दावा केला की वॉशिंग्टनने रशियन तेलाच्या खरेदीवर नवी दिल्लीवर दंड जाहीर केल्यानंतर रशियाने भारताला आपले एक तेल ग्राहक म्हणून गमावले आहे. मात्र, त्यांनी असेही सूचित केले की रशियन कच्चे तेल खरेदी करत असलेल्या देशांवर ते असे दुय्यम टॅरिफ (secondary tariffs) लादणार नाहीत.
अमेरिकेने युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्यासाठी काहीच पावले उचलली नाहीत तर मॉस्कोवर आणि त्याचे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दुय्यम निर्बंध (secondary sanctions) लादण्याची धमकी दिली होती. चीन आणि भारत हे रशियन तेलाचे दोन सर्वात मोठे खरेदीदार आहेत.
( नक्की वाचा : Trump Putin Meet : अलास्काच्या बर्फात राजकीय धग! ट्रम्प-पुतिन यांची भेट भारतासाठी इतकी महत्त्वाची का? )
ट्रम्प यांनी याबाबत फॉक्स न्यूजशी बोलताना सांगितले, "रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर (पुतिन) यांनी एक तेल ग्राहक गमावला आहे, तो म्हणजे भारत. जो त्यांच्या एकूण तेलापैकी सुमारे 40 टक्के तेल खरेदी करत होता. चीन, तुम्हाला माहीत आहे, खूप खरेदी करत आहे... आणि मी दुय्यम निर्बंध किंवा दुय्यम टॅरिफ लावला, तर त्यांच्या दृष्टीने ते खूपच विनाशकारी असेल. मला ते करावे लागले, तर मी ते करीन... पण कदाचित मला ते करावे लागणार नाही. ''
भारताने केला निषेध
भारताने यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ लावण्याचा निर्णयाचा निषेध केला आहे. भारतानं या निर्णयाचं वर्णन "अन्यायकारक, अवाजवी आणि अयोग्य" असं केलं होतं. या निर्णयामुळे वस्त्रोद्योग, सागरी उत्पादन आणि चामड्याच्या वस्तूंच्या निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, आर्थिक दबावापुढे भारत झुकणार नाही.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार, ट्रम्प यांच्या कृतीनंतर भारतातील सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्यांनी रशियन कच्चे तेल खरेदी करणे थांबवले आहे, जरी याबाबत केंद्र सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
गुरुवारी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष एएस साहनी म्हणाले की, भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवलेली नाही आणि ते केवळ आर्थिक विचारांवर आधारित खरेदी सुरू ठेवतील. 2022 मध्ये, पाश्चात्त्य देशांनी रशियन तेलावर बहिष्कार टाकून आणि युक्रेनवरील हल्ल्याबद्दल मॉस्कोवर निर्बंध लादल्यानंतर भारत रशियन तेलाचा सर्वात मोठा ग्राहक बनला.