होर्मुझ बंद असतानाही अमेरिकेनं कसं काढलं 10 कोटी बॅरल तेल? NDTV ने शोधून काढले सॅटेलाइट पुरावे

US secret mission: स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असूनही अमेरिकेनं तिथून तब्बल 10 कोटी बॅरल कच्चं तेल कसं बाहेर काढलं, याचा एक मोठा खुलासा झाला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
US secret mission: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 जून रोजी एका गुप्त लष्करी मोहिमेची घोषणा केली.
मुंबई:

US secret mission: स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद असूनही अमेरिकेनं तिथून तब्बल 10 कोटी बॅरल कच्चं तेल कसं बाहेर काढलं, याचा एक मोठा खुलासा झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 जून रोजी एका गुप्त लष्करी मोहिमेची घोषणा केली. मे महिन्यापासून आतापर्यंत या मोहिमेद्वारे स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या माध्यमातून 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाची वाहतूक करण्यात आली आहे. 

ट्रम्प यांनी या मोहिमेची कोणतीही गुप्त माहिती जाहीर केली नसली, तरी एनडीटीव्ही डेटाफायनं (NDTV Datafy) सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून या संपूर्ण ऑपरेशनचा पर्दाफाश केला आहे. ओपन-सोर्स इंटेलिजेंस (OSINT) रिसर्च, सागरी विश्लेषक आणि मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे अमेरिकेच्या या गुप्त मोहिमेचे अनेक पुरावे समोर आले आहेत.

Advertisement

अदृश्य जहाजांचा 'डार्क फ्लीट' गेम

या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्य आणि त्यांच्या मित्रराष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तेल पोहोचवण्यासाठी जहाजांचा एक अदृश्य बेडा म्हणजेच 'डार्क फ्लीट' होर्मुझच्या समुद्रात उतरवला होता. 

डार्क फ्लीट म्हणजे अशी व्यावसायिक जहाजे, जी प्रवासादरम्यान आपली ओळख, ठिकाण आणि स्पीड याबद्दलची कोणतीही माहिती यंत्रणेला देत नाहीत, म्हणजेच आपले सिग्नल पूर्णपणे बंद ठेवतात. तेलाची ही संपूर्ण वाहतूक दोन टप्प्यांत पार पडल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या टप्प्यात कुवैत, युएई आणि सौदी अरेबिया सारख्या आखाती देशांच्या सरकारी कंपन्यांच्या मालकीच्या टँकर्सनी पर्शियन गल्फमधील एक्सपोर्ट टर्मिनल्सवरून तेल लोड केले. होर्मुझच्या मार्गाने अत्यंत लहान प्रवासासाठी हे तेल भरण्यात आले होते. या जहाजांची वाहतूक अमेरिकन जेट विमाने, हेलिकॉप्टर्स आणि युद्धनौकांच्या कडक सुरक्षेत झाली असण्याची दाट शक्यता आहे. 

या जहाजांनी अमेरिकन सैन्याने तयार केलेल्या अत्यंत अरुंद आणि धोकादायक जलमार्गाचा वापर केला. ओमानच्या किनाऱ्याला लागून असलेल्या या मार्गाची रुंदी काही ठिकाणी अवघी 800 मीटर होती. संपूर्ण प्रवासात सिग्नल बंद असल्याने ही जहाजे कोणाच्याही नजरेत आली नाहीत.

Advertisement

ओमानच्या समुद्रात 'शिप-टू-शिप' ट्रान्सफर

दुसऱ्या टप्प्यात या टँकर्सनी ओमानच्या सोहार आणि शिनास या दोन बंदरांजवळ आपले तेल इतर व्यावसायिक जहाजांमध्ये ट्रान्सफर केले. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अमेरिकन सैन्याने ओमानच्या खाडीत मोठ्या संख्येने युद्धनौका आणि फायटर जेट्स तैनात केले आहेत. काही दिवसांपूर्वी होर्मुझजवळ इराने केलेल्या कारवाई दरम्यान कोसळलेले अमेरिकेचे अपाचे हेलिकॉप्टरही याच शिपिंग ऑपरेशनच्या सुरक्षेसाठी तैनात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तेलाचे हे ट्रान्सफर ओमानच्या सागरी हद्दीत झाले, ज्यामुळे इराणच्या संभाव्य हल्ल्यांपासून या जहाजांना संरक्षण मिळाले. ओमान हा एकमेव असा आखाती देश आहे ज्याचे इराण आणि इतर आखाती देशांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे युद्धाच्या काळात हा परिसर अमेरिकेसाठी एका सुरक्षित तळासारखा ठरला. 

Advertisement

सॅटेलाइट फोटोंनुसार, मे महिन्यापासून हे ट्रान्सफर सुरू झाले होते, पण जूनमध्ये त्याला मोठी गती आली. 6 जून रोजी युरोपियन स्पेस एजन्सीने घेतलेल्या फोटोंमध्ये सोहार बंदरापासून 10 किलोमीटर अंतरावर अशा प्रकारे तेल ट्रान्सफर करणारी किमान 9 जहाजे स्पष्टपणे दिसून आली आहेत.

( नक्की वाचा : अहमदाबाद विमान अपघाताला 1 वर्ष पूर्ण; मृत्यूला हुलकावणी देणारा एकमेव प्रवासी आज कोणत्या वेदनेतून जातोय? )
 

ट्रम्प यांचा दावा आणि वाढलेला तेल पुरवठा

डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 जूनच्या रात्री ट्विट करून या मोहिमेची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले की, गेल्या महिन्यात मी माझ्या महान अमेरिकन सैन्याला पर्शियन गल्फमधून जाणाऱ्या तेल टँकर्स आणि व्यावसायिक जहाजांना मदत करण्यासाठी एक गुप्त मोहीम चालवण्याचे निर्देश दिले होते. 

या प्रयत्नांमुळे 100 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल होर्मुझमधून खुल्या बाजारात पोहोचले आहे, ही घोषणा करताना मला आनंद होत आहे. होर्मुझमध्ये इराणचा नाही तर अमेरिकेचा दबदबा आहे हे दाखवण्यासाठी ट्रम्प यांनी 200 पेक्षा जास्त जहाजे या मार्गावरून सुखरूप गेल्याचा दावा केला.

दुसरीकडे, अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनीही संसदेच्या समितीला सांगितले की, पर्शियन गल्फमधून तेलाचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे अमेरिकेचे ऑपरेशन उत्तम रितीने सुरू आहे. अमेरिकेचा हा दावा व्यावसायिक शिपिंग डेटा आणि आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सशी जुळणारा आहे. 

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, या महिन्यात स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जाणाऱ्या गैर-इराणी तेलाच्या पुरवठ्यात तब्बल 50 टक्के वाढ झाली आहे. फायनान्शियल टाइम्सनुसार, ओमानच्या मार्गाने दररोज सुमारे 15 जहाजे पर्शियन गल्फमध्ये ये-जा करत होती.

लाईट्स बंद करून प्रवास करण्यासारखा धोका

जहाजांच्या ट्रॅकिंग सिस्टमवर नजर टाकली तर या मार्गावरून तेलाची वाहतूक नगण्य दिसते, कारण सर्व जहाजे 'डार्क मोड'मध्ये म्हणजेच सिग्नल बंद करून प्रवास करत आहेत. लॉयड्स लिस्ट इंटेलिजेंस आणि विंडवर्डच्या मते, गेल्या आठवड्यात अशा अदृश्य जहाजांची संख्या दररोज 2 वरून 6 वर पोहोचली आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी या मार्गावरून रोज 100 पेक्षा जास्त जहाजे जात असत.

या अरुंद मार्गावरून प्रवास करणे किती धोकादायक आहे, याबद्दल एका टँकर कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा दोन बाजूंनी ट्रॅफिक असलेला सिंगल-लेन रस्ता आहे, जिथे अजस्र जहाजांना वळण्यासाठी अजिबात जागा नाही. हा प्रवास म्हणजे रात्रीच्या वेळी गाडीच्या हेडलाईट्स पूर्णपणे बंद करून एखाद्या गावातील अरुंद रस्त्यावरून गाडी चालवण्यासारखा आहे, जिथे अपघाताचा धोका अत्यंत जास्त असतो.
 

Topics mentioned in this article