अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी अनेक देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या या निर्णयाचे पडसाद आता जगभरात जाणवू लागले आहेत. जगभरातील शेअर मार्केटमध्ये याचे पडसाद उमटले. आगामी काळ हे पडसाद कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या टॅरीफ वॉरमुळे आता माकडे देखील महाग होणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकन औषधी कंपन्या चाचण्यांसाठी वापरत असलेल्या लांब शेपटीच्या माकडांची आयात 40 टक्के महाग होणार आहे. मॉरिशसने 2023 मध्ये अमेरिकन फार्मास्युटिकल संशोधनासाठी आवश्यक असलेल्या 60% प्राइमेट्सचा (मनुष्य सदृश्य जनावरं) पुरवठा केला आहे. त्यांनी गेल्या वर्षी 13,484 माकड पाठवले होते. आफ्रिका खंडातील देशांच्या तुलनेत मॉरिशेसवर अमेरिकन सरकारनं आयात शुल्क अधिक लागू केले आहे. त्याचा परिणाम या देशातून होणाऱ्या साखर आणि कापड या दोन प्रमुख उत्पादनाच्या निर्यातीवरही होणार आहे.
मॉरिशियन माकडांनी कोव्हिड-19 लस विकसित करण्यात आणि जगातील असंख्य जणांचा जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, अशी माहिती त्यांच्या देशातील सायनी ब्रीडर्स असोसिएशननं दिली आहे.
( नक्की वाचा : US Tariff : अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के टॅरिफ, ट्रम्प यांनी 50 टक्के सूट का दिली?)
या माकडांच्या विक्रीतून दशकभरापूर्वी 20 दशलक्ष डॉलर महसूल मिळत होता. हे प्रमाण आता 86.6 दशलक्ष डॉलरपर्यंत पोहचले आहे. तर 2014 मध्ये प्रति माकडाची किंमत 2,236 डॉलर्ल होती. ती आता 6,425 डॉलर्सवर पोहचली आहे, अशी माहिती मॉरिशेसचे कृषी-औद्योगिक मंत्री अरविन बुलेल यांनी मार्च महिन्यात दिली होती.
मॉरिशसला प्रत्येक माकडाच्या निर्यातीमधून 200 डॉलर्सची कमाई होते. ही रक्कम संवर्धन उपक्रमासाठी वापले जाते, अशी माहिती अमेरिकेचे टॅरिफ वॉर सुरु होण्यापूर्वी मंत्र्यांनी दिली होती. ही रक्कम तुलनेनं कमी आहे, आम्ही त्याचे पुनरावलोकन करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
जैवविविधतेच्या दृष्टीनं मॉरिशेसमध्ये या माकडांना एक आक्रमक प्रजाती म्हणून पाहिले जाते. शेतात आणि नागरिकांसाठी हे धोक्याचे आहे, असं त्यांनी सांगितलं.