- अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये असलेला सर्वात महागडा बंगला अवघ्या दहा डॉलर्समध्ये विकला गेला
- या बंगल्याची सध्याची बाजारमूल्य सुमारे २९० कोटी रुपये आहे
- मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांचे जावई दानियार केसिकाबायेव यांनी हा बंगला खरेदी केला आहे
खरेदी विक्रीचे काही व्यवहार असे असतात की ते तुम्हाला विचार करायला भाग पडतात. काही घर, बंगले, फ्लॅट इतक्या कोटींना विकले जातात की सर्व सामान्य फक्त पाहात राहण्या शिवाय काहीच करू शकत नाहीत. पण काही व्यवहार असेही होतात की ज्याची चर्चा शहरा, राज्यात, देशात नाही तर जगात होते. असाच एक जबरदस्त खरेदी विक्रीचा व्यवहार समोर आला आहे. अमेरिकेतील न्यू जर्सी इथला सर्वात महागडा बंगला कवडी मोल विकला गेला आहे. हे कसं शक्य झालं याचाच विचार सर्व जण करत आहे. शिवाय हा बंगला इतका स्वस्त कुणी घेतला याची ही चर्चा आहे.
अमेरिकेतील न्यू जर्सी येथील सर्वात महागडा आणि तेवढाच आलिशान बंगला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. 35.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 290 कोटी रुपये किंमतीचा हा बंगला आहे. त्याचे हे सध्याचे बाजारमूल्य आहे. पण हाच राजवाड्या समान असलेला अलिशान बंगला अवघ्या 10 डॉलर्समध्ये म्हणजेच भारतीय चलनानुसार अवघ्या 830 रुपयांत खरेदी करण्यात आला आहे. हा बंगला कवडी मोला खरेदी करणारी व्यक्ती ही साधी नाही. मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांचे जावई दानियार केसिकाबायेव यांनी हा बंगला खरेदी केला आहे.
दानियार यांच्या कुटुंबाचे कझाकिस्तानच्या माजी हुकूमशहाशी संबंध असल्याने त्यांना तेथे 'प्रिन्स' म्हणून ओळखले जाते. न्यू जर्सीमधील अत्यंत उच्चभ्रू भागात हा बंगला आहे. न्यू जर्सीच्या अल्पाइन परिसरातील '2 मार्गो वे' या पत्त्यावर हा भव्य अलिशान बंगला आहे. 3.1 एकर परिसरात हा बंगला पसरला आहे. जवळपास 17,150 चौरस फुटांचा हा अवाढव्य बंगला आहे. या बंगल्यात 9 मोठे बेडरूम आहेत. शिवाय बास्केटबॉल कोर्ट, होम थिएटर, लायब्ररी आणि दोन स्विमिंग पूल ही आहेत. 2012 मध्ये हा बंगला एका शेल कंपनीमार्फत 165 कोटी रुपयांना रोख रकमेत खरेदी करण्यात आला होता. ही कंपनी दानियार यांच्याशी संबंधित होती.
आता 2026 च्या कर मूल्यांकनानुसार या घराची किंमत कमालीची वाढली आहे. दानियार केसिकाबायेव यांनी अवघ्या 10 डॉलर्समध्ये हा बंगला स्वतःच्या नावावर करून घेतला आहेत. आता ते या बंगल्याचे मालक आहेत. तर दानियार यांचे सासरे मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक सध्या 4.5 अब्ज डॉलर्सच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. या व्यवहारावरून मलेशियात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. रजाक यांच्या पत्नी रोसमाह मन्सूर यांनी या प्रकरणातील आरोपांनंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मात्र, अधिकृत नोंदीनुसार ही मालमत्ता अद्याप दानियार यांच्याच नावावर आहे.