जाहिरात

Alandi flood: आळंदीला पुराचा वेढा! पहिल्या मजल्यापर्यंत चढले पाणी; भक्त निवासातून 'त्या' 24 जणांना कसे वाचवले?

Alandi flood: आळंदीमध्ये पुराच्या संकटातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने अत्यंत धाडसी आणि कौशल्याने मोठी बचाव मोहीम राबवली आहे.

Alandi flood: आळंदीला पुराचा वेढा! पहिल्या मजल्यापर्यंत चढले पाणी; भक्त निवासातून 'त्या' 24 जणांना कसे वाचवले?
Alandi Flood : इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीमध्ये परिस्थिती गंभीर आहे.
आळंदी, पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Alandi flood: राज्यात पावसाचा जोर वाढलेला असतानाच भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीला  पुराच्या पाण्याने वेढा घातला. इंद्रायणी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे अनेक भागात पाणी घुसले आणि पाहता पाहता शेकडो नागरिक तसेच भाविक पूरपरिस्थितीत अडकले. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीनंतर प्रशासकीय यंत्रणा तातडीने अ‍ॅक्शन मोडमध्ये आली. आळंदीमध्ये आलेल्या या पुराच्या संकटातून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने अत्यंत धाडसी आणि कौशल्याने मोठी बचाव मोहीम राबवली आहे.

आळंदीत मोठे बचावकार्य

इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्यामुळे आळंदी शहरातील विविध भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी आळंदी नगरपरिषद, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकांनी एकत्र येत युद्धपातळीवर काम सुरू केले. वेगवेगळ्या भागात अडकलेल्या एकूण 408 भाविकांना या सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सुरक्षित स्थळी हलविण्यात यश आले आहे.

वेगवेगळ्या भागातून नागरिकांची सुरक्षित सुटका

पूर परिस्थितीचा फटका बसलेल्या आळंदीतील प्रमुख चार भागांवर बचाव पथकाने आपले लक्ष केंद्रित केले होते. यामध्ये पथकांनी ज्ञानेश्वरी मंदिर परिसरातून 220 नागरिकांना बाहेर काढले. यासोबतच इंद्रायणी नगरी येथून 100, ठाकूरबुवा मंडप परिसरातून 60 आणि गोपाळपुरा भागातून 28 अशा एकूण 408 भाविकांची पुरातून सुरक्षित सुटका करण्यात आली. वैयक्तिकरित्या अडकलेल्या इतर काही लोकांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले असून मानवांसोबतच पूरग्रस्त भागातील 150 गायींचीही प्रशासनाने सुखरूप सुटका केली आहे.

भक्त निवास इमारतीत अडकले होते पोलीस

या पूरपरिस्थितीदरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या भक्त निवास इमारतीमध्ये एक मोठी घटना घडली. नवी मुंबई पोलीस दलातील 20 पोलीस अंमलदार आणि इतर 4 नागरिक असे एकूण 24 जण आज सकाळी 6:00 वाजेपासून या इमारतीमध्ये अडकून पडले होते. मुसळधार पावसामुळे या इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पुराचे पाणी चढले होते, ज्यामुळे तिथला वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता आणि बाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.

भक्त निवासात पोलीस कर्मचारी आणि नागरिक अडकल्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाला. त्यानंतर पीएमआरडीए आपत्कालीन व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालीन पथकाने पाण्याचा जोरदार प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इमारतीत अडकलेल्या सर्व 20 पोलीस कर्मचाऱ्यांना आणि इतर 4 नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. सध्या हे सर्व नागरिक सुरक्षित असून परिस्थितीवर संबंधित विभागांकडून सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि आवश्यकतेनुसार प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com