Hawa Baloch Last Message Video : बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराशी दोन हात करणाऱ्या एका महिला फिदायीनचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हवा बलोच असे या तरुणीचे नाव असून, मरण्यापूर्वी तिने पाकिस्तानी सैनिकांवर गोळ्या झाडत हसत हसत मृत्यूला कवेत घेतले. या व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानच्या बलाढ्य लष्कराला चक्क कायर म्हणून हिणवत असून, बलुच महिलांच्या धैर्याचे दर्शन घडवत आहे. हा व्हिडिओ समोर आल्याने पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
काय आहे व्हिडिओ?
बलुचिस्तानमध्ये सध्या रक्ताचा सडा पडत असून बलोच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्कराच्या नाकी नऊ आणले आहेत. 'ऑपरेशन हेरोफ'च्या दुसऱ्या टप्प्यात एका महिला फिदायीनचा व्हिडिओ समोर आला आहे. हवा बलोच असे या महिला आत्मघाती हल्लेखोराचे नाव असून, मृत्यूच्या काही तास आधी तिने रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये ती पाकिस्तानी सैन्यावर हसत हसत गोळ्या झाडताना दिसत आहे.
बलुचिस्तानच्या ग्वादर फ्रंटवरून समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये हवा बलोच अत्यंत आत्मविश्वासाने लढताना दिसत आहे. तिने लाल आणि निळ्या रंगाचा कुर्ता आणि डोक्यावर BLA चा लोगो असलेली टोपी घातली आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणते की, आज तुमची एक बहीण पंजाबी सैन्याचा सामना करत आहे, आता तुम्ही सुद्धा धैर्याने पुढे आले पाहिजे.
( नक्की वाचा : Baloch Liberation Army : बलोच लिबरेशन आर्मी काय आहे? त्यांचं पाकिस्तान सरकारशी वैर का? )
काय होता हवा बलोचचा शेवटचा संदेश?
हवा बलोचने तिचा जीव देण्याच्या 12 तास आधी हा व्हिडिओ संदेश रेकॉर्ड केला होता. तिने बलुचिस्तानच्या जनतेला आवाहन केले की, आता शांत बसून चालणार नाही, तर आपल्या योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची वेळ आली आहे. शत्रूचे दिवस आता मोजकेच उरले आहेत आणि त्यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे तिने ठामपणे सांगितले.
व्हिडिओत पाकिस्तान डरपोक असल्याचा दावा करत ती म्हणते की, ते दुरून गोळीबार करत आहेत, त्यांच्यात समोर येण्याची हिंमत नाही. या व्हिडिओच्या शेवटी हवा बलोचचा रक्ताने माखलेला मृतदेह जमिनीवर पडलेला पाहायला मिळतो.
कोण आहे हवा बलोच?
मिळालेल्या माहितीनुसार, हवा बलोच ही सुशिक्षित तरुणी होती. तिचे वडील सुद्धा बलोच लिबरेशन आर्मीमध्ये लढा देत होते, ज्यांना 2021 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मारले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर ती या बंडखोर गटात सामील झाली होती. संघटनेत तिला 'ड्रोशुम' हे सांकेतिक नाव (कॉल साइन) देण्यात आले होते. तिचे हे पाऊल बलुचिस्तानमधील सुशिक्षित तरुणांचा वाढता सशस्त्र सहभाग अधोरेखित करते.
दुसरी फिदायीन आसिफा मेंगलचा आत्मघाती हल्ला
BLA ने केवळ हवा बलोचच नाही, तर 24 वर्षीय आसिफा मेंगल या दुसऱ्या महिला फिदायीनची माहिती सुद्धा दिली आहे. आसिफा मेंगलने 31 January 2026 रोजी नोशकी येथील ISI मुख्यालयावर कार बॉम्बचा (VBIED) वापर करून मोठा आत्मघाती हल्ला केला. या हल्ल्यात आसिफाचा मृत्यू झाला असून तिने पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाला लक्ष्य करून मोठा इशारा दिला आहे.
बलुचिस्तानमध्ये 40 तासांपासून खूनी संघर्ष सुरू
सध्या बलुचिस्तानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 40 तासांपासून भीषण युद्ध सुरू आहे. बलोच लिबरेशन आर्मीने दावा केला आहे की त्यांनी पाकिस्तानी लष्कर आणि पोलिसांचे 200 पेक्षा जास्त जवान मारले आहेत आणि 17 जणांना बंदी बनवले आहे.
मात्र, दुसरीकडे पाकिस्तान सरकारने हे दावे फेटाळून लावत 145 बंडखोरांना मारल्याचे म्हटले आहे आणि स्वतःच्या बाजूचे केवळ 17 सैनिक शहीद झाल्याचे सांगितले आहे. बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीवर पाकिस्तानने कब्जा केल्याचा आरोप करत येथील स्थानिक गट अनेक वर्षांपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत.
इथे पाहा संपूर्ण VIDEO