Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये दोन्ही देशांचं मोठं नुकसान झालंय. त्याचबरोबर युद्धामुळे इंधनाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्यानं संपूर्ण जगाला याची झळ बसली आहे. हे युद्ध संपवण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून अनेक प्रयत्न झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये या दोन्ही देशांचा दौरा केला. या दौऱ्यातही त्यांनी 'युद्ध नको बुद्ध हवा' ही भारताची भूमिका दोन्ही राष्ट्रप्रमुखांना सुनावली. मोदींच्या या प्रयत्नांना यश येण्याची चिन्ह आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनीच हा प्रस्ताव ठेवला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे पुतीन यांचा प्रस्ताव?
न्यूज एजन्सी रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार भारत, चीन िकंवा ब्राझील हे देश दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करु शकतात, असं पुतीन यांनी स्पष्ट केलं आहे. रशियातील व्लादिवोस्तोक शहरात झालेल्या इस्टर्न इकोनॉमिक फोरममध्ये (EEZ) बोलताना पुतीन म्हणाले की, '2022 मध्ये हे यु्द्ध सुरु झालं त्यावेळी तुर्कियेनं दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांच्या अटी कधीही लागू झाल्या नाहीत. आता नव्यानं चर्चा सुरु करण्यासाठी जुन्या प्रयत्नांना आधार बनवता येऊ शकेल. युक्रेनमधील डोनबास क्षेत्र ताब्यात घेणं हा रशियाचा पहिला उद्देश असल्याचं पुतीन यांनी स्पष्ट केलंय.
( नक्की वाचा : पुतीन यांनी किम जोंगला दिली लग्झरी कार, हुकुमशाहनं दिलं खास रिटर्न गिफ्ट! )
झेलन्सकींचीही इच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 जुलै रोजी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी पुतीन यांच्याशी युद्ध थांबवण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी मोदींनी युक्रेनचा दौरा केला होता. त्यावेळी दुसऱ्या शांतता चर्चेचं भारतानं यजमान व्हावं, अशी इच्छा युक्रेनचे अध्यक्ष वोलदिमीर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली होती. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारतानं मध्यस्थी करावी अशी इच्छा अमेरिकेनं यापूर्वीच व्यक्त केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला 6 ऑगस्ट 2024 रोजी नवं वळण मिळालं. या युद्धात पहिल्यांदाच युक्रेननं रशियामध्ये घुसून त्यांचा कुर्स्क भाग ताब्यात घेतला. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियातील जमिनीचा दुसऱ्या देशानं ताबा घेण्याची ही पहिली घटना आहे. युक्रेनच्या या चढाईनंतर रशियानंही युक्रेनवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत.