बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अल्पसंख्याक आणि विशेषत: हिंदूंना लक्ष्य करण्यात येत आहे. देशातील इस्कॉन मंदिरं बंद करण्यात आली आहेत. त्याचबरोबर इस्कॉनशी संबंधित 17 जणांची बँक खाती 30 दिवसांसाठी गोठवण्यात आली आहेत. वेगवेगळ्या मीडिया रिपोर्टनपुसार ही बातमी समोर आली आहे. इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय दास यांचं बँक खातं देखील गोठवण्यात आलंय. बांगलादेश उच्च न्यायालयाकडून आंतरराष्ट्रीय कृष्ण चेतना सोसायटी (इस्कॉन) वर बंदी घालावी ही याचिका फेटाळण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'प्रोथोम एलो' या वृत्तपत्रातील माहितीनुसार बांगलादेशमधील आर्थिक गुप्तचर संस्थेनं (बीएफआययू) गुरुवारी वेेगवेगळ्या बँका आणि आर्थिक संस्थांना निर्देश दिले आहेत. त्यामध्ये या खात्याशी संबंधित सर्व व्यवहार एक महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहेत. सेंट्रल बांगलादेश बँकसह अन्य बँका तसंच आर्थिक संस्थांना हे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना या 17 व्यक्तींच्या मालकीचे सर्व व्यवसाय आणि खात्यांशी संबंधित व्यवहारांची माहिती पुढील तीन दिवसांमध्ये देण्याचा आदेश देण्यात आले आहेत.
मंदिरांमध्ये तोडफोड
बांगलादेशमधील चट्टोग्राममध्ये शुक्रवारी जमावानं घोषणाबाजी करत तीन हिंदू मंदिरांची तोडफोड केली. इस्कॉनच्या माजी सदस्यांच्या विरोधात देशद्रोहाची तक्रार दाखल झाल्यानंतर चट्टोग्राममध्ये आंदोलन सुरु आहे. न्यूज पोर्टल 'बीडीन्यूज 24 डॉट कॉम' नं दिलेल्या वृत्तानुसार, हा हल्ला हरीश चंद्र मुनसेफ लेनमध्ये दुपारी 2.30 च्या आसपास झाला. या हल्ल्यात शांतानेश्वरी मातृ मंदिर, शनी मंदिर आणि शांतनेश्वरी कालीाबाडी मंदिर यांना लक्ष्य करण्यात आले.
( नक्की वाचा : Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर चीनची झोप का उडाली आहे? )
या न्यूज पोर्टलनं दिलेल्या वृत्तानुसार घोषणाबाजी करणाऱ्या शेकडो लोकांच्या गटानं मंदिरावर दगड आणि वीटांचा वर्षावर केला. या हल्ल्यात शनी मंदिरासह अन्य मंदिरांचं नुकसान झालं. कोतवाली पोलीस स्टेशनचे प्रमुख अब्दुल करीम यांनी या हल्ल्याला दुजोरा दिलाय. हल्लेखोरांनी मंदिराचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला. पण, या हल्ल्यात मंदिराचं नुकसान खूप कमी झालंय, असा दावा त्यांनी केला.
कधी सुरु झाला विरोध?
'सनातन जागरण जोत' चे प्रवक्ता चिन्मय कृष्ण दास यांच्यावर गेल्या महिन्यात चितगावमध्ये भगवा ध्वज फडकावणे आणि बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा कथित अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरात दास यांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
दास यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी बांगलादेशच्या हिंदूंनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. या आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारात सैफुल इस्लाम आलिफ या 32 वर्षांच्या वकिलाचा मृत्यू झाला आहे. बांगलादेशच्या कट्टरतावादी लोकांनी सैफूलच्या मृत्यूला दास समर्थकांना दोषी ठरवलंय. पण, इस्कॉन आणि अन्य हिंदू संघटनांनी या हिंसाचाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय.